आदिवासी विद्यार्थ्यांची दिवसभर उपासमार

By Admin | Updated: September 11, 2016 01:23 IST2016-09-11T01:10:03+5:302016-09-11T01:23:52+5:30

औरंगाबाद : अरेरावी करणाऱ्या आणि निकृष्ट जेवण देणाऱ्या मेसचालकाने दिवसभर उपाशी ठेवल्याने जटवाडा रोडवरील आदिवासी विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा शनिवारी बांध फुटला.

Tribal students starvation throughout the day | आदिवासी विद्यार्थ्यांची दिवसभर उपासमार

आदिवासी विद्यार्थ्यांची दिवसभर उपासमार

औरंगाबाद : अरेरावी करणाऱ्या आणि निकृष्ट जेवण देणाऱ्या मेसचालकाने दिवसभर उपाशी ठेवल्याने जटवाडा रोडवरील आदिवासी विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा शनिवारी बांध फुटला. रात्रीचे जेवण नाकारून शंभराहून अधिक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. थाळीनाद करीत विद्यार्थी वसतिगृहातून बाहेर पडले व त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे कूच केले.
जटवाडा रोडवर आदिवासी दोनशे विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृह आहे. गेल्या काही दिवसांपासून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार आहे. शनिवारी दुपारचे जेवण दिले नाही. त्याऐवजी सायंकाळी खिचडी आणण्यात आली. विद्यार्थ्यांनी दुपारचे जेवण का आणले नाही, याचा जाब विचारल्यानंतर मेसचालकाच्या माणसांकडून विद्यार्थ्यांना धमकावणीचा प्र्रकार झाला. सायंकाळपर्यंत अनेक विद्यार्थी वसतिगृहात आले. त्यानंतर संतप्त विद्यार्थी रात्रीचे जेवण नाकारून हातात थाळ्या घेऊन रस्त्यावर उतरले. जटवाडा रोडने ते हर्सूल जेलच्या दिशेने निघाले. थाळीनाद करीत शंभरहून अधिक विद्यार्थी थाळीनाद करीत पुढे कूच करताना दिसले.
मेसचालकाला किती रक्कम
वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्यामागे मेसचालकाला ३२८५ रुपये इतकी रक्कम देण्यात येते. यामध्ये नाष्टा आणि दोन वेळच्या जेवणाचा समावेश आहे. रविवारी आणि सणाच्या दिवशी ‘फिस्ट’ (स्वीट) दिली जावी, असे बंधन आहे. मेसचालकाला मिळणाऱ्या रकमेच्या तुलनेत जेवणाला दर्जा नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील आदिम आदिवासी स्वयंरोजगार संस्था यांच्याकडे जेवणाचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, ज्या संस्थेने मूळ कंत्राट घेतले आहे, ती संस्था मेस चालवीत नाही. मेस चालविणारे बिगर आदिवासी लोक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
वसतिगृहात आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी भेट देतात. मात्र ते विद्यार्थ्यांची बाजू न घेता कंत्राटदारालाच पाठीशी घालतात. विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे लक्ष दिले जात नाही. वेदांतनगर परिसरातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीही अशीच तक्रार केली आहे. सध्या गजानन फुंडे हे अधिकारी नव्याने रुजू झाले आहेत.

Web Title: Tribal students starvation throughout the day