साखरेचे दर वाढले, तरी गूळ महाग ; तब्येतीसाठी मात्र गूळच परवडला !

By प्रशांत तेलवाडकर | Published: October 26, 2023 07:44 PM2023-10-26T19:44:43+5:302023-10-26T19:45:26+5:30

साखर खाल्ल्याने शरीराला होणारे नुकसान अधिक आहे. यामुळे तब्येतीसाठी गूळ बरा, असे म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

Sugar prices increased, but jaggery expensive; Jaggery is affordable for health! | साखरेचे दर वाढले, तरी गूळ महाग ; तब्येतीसाठी मात्र गूळच परवडला !

साखरेचे दर वाढले, तरी गूळ महाग ; तब्येतीसाठी मात्र गूळच परवडला !

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या दिवसात साखर व गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. उत्पादन कमी असल्याने साखरेचे भाव किलोमागे १ रुपयाने वाढले आहे. दुसरीकडे गुळाचे भाव मागील ६ महिन्यांपासून स्थिर आहेत. पण, अजूनही साखर व गुळाच्या भावात मोठी तफावत आहे. मागील काही वर्षांपासून साखरेपेक्षा गूळ वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कारण, साखर खाल्ल्याने शरीराला होणारे नुकसान अधिक आहे. यामुळे तब्येतीसाठी गूळ बरा, असे म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

साखर ४२ रुपये किलो
मागील आठवड्यात साखरेच्या भावात किलोमागे १ रुपया वाढ होऊन ४२ ते ४३ रुपये किलोने बाजारात साखर मिळत आहे. मागील वर्षी याच काळात ३६ ते ३७ रुपये किलो भाव होते.

गूळ ४९ पासून २०० रुपयांपर्यंत
बाजारात मागील ६ महिन्यांपासून गुळाचे भाव स्थिर आहेत. आजघडीला किराणा दुकानात ४९ ते ६० रुपये किलोदरम्यान गूळ विक्री होत आहे. सेंद्रिय गूळ ७५ ते १५० रुपये किलो तर गुळाची पावडर २०० रुपये किलोने विकली जात आहे.

किती कोटा जाहीर होत यावर तेजी-मंदी अवलंबून
दर महिन्याला केंद्र सरकार साखरेचा कोटा जाहीर करीत असते. ऑक्टोबर महिन्यासाठी २३ लाख ५० हजार मे. टनचा कोटा दिला होता. नोव्हेंबरमध्ये दिवाळी सण आहे. यामुळे २५ लाख मे. टन कोटा दिला तर साखरेचे भाव वाढणार नाहीत. पण, त्यापेक्षा कमी कोटा आला तर भाव वाढतील.
- रिंकू खटोड, व्यापारी

गूळ खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले
पूर्वी १०० ग्राहकांपैकी ९० ग्राहक हे महिन्याला १० किलोपेक्षा अधिक साखर खरेदी करीत होते. आता ६५ टक्के ग्राहक गूळ खरेदी करतात. साखरेचा वापर त्यांनी अगदी कमी केला आहे. कमी उत्पादनामुळे यंदा साखर व गुळाचे भाव तेजीत आहेत.
-स्वप्निल जैन, व्यापारी

गूळ खाण्यास प्राधान्य द्यावे

गुळात लोह जास्त असते. साखरेपेक्षा गुळाचे पचन लवकर होते. गुळामुळे रक्तातील साखर वाढत नाही. पण, साखर थेट खाल्ल्याने त्याचा परिणाम इन्सुलिन्सवर होतो. शरीरातील चरबी वाढते. गुळाच्या सेवनामुळे चरबी वाढत नाही. साखर वयाच्या चाळिशीनंतर वापरूच नये. ज्यांना मधुमेह आहे अशांनी तर साखर व गूळ दोन्ही वर्ज्य करावे. पण, गोड खायचे झालेच तर गूळ खाण्यास प्राधान्य द्यावे. त्यातही थोडासा काळसर गूळ खरेदी करणे उत्तम, त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते.
-अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

Web Title: Sugar prices increased, but jaggery expensive; Jaggery is affordable for health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.