पुणेरी फेट्यामुळे बेरोजगार तरूणाला मिळाले जगण्याचे बळ

By Admin | Updated: July 16, 2016 01:13 IST2016-07-16T01:01:18+5:302016-07-16T01:13:24+5:30

सितम सोनवणे , लातूर ‘हा छंद जीवाला लावी पिसे...’ असे म्हणतात ते उगीच नाही. छंद...! मग तो कोणताही असो, मनाला ओढ लावतो, तसेच घराला सावरतोही! असाच एक छंदिष्ट लातूरलाही आताशा परिचित झालेला आहे. ‘

Strengthening to get unemployed youth due to Puneri Rally | पुणेरी फेट्यामुळे बेरोजगार तरूणाला मिळाले जगण्याचे बळ

पुणेरी फेट्यामुळे बेरोजगार तरूणाला मिळाले जगण्याचे बळ


सितम सोनवणे , लातूर
‘हा छंद जीवाला लावी पिसे...’ असे म्हणतात ते उगीच नाही. छंद...! मग तो कोणताही असो, मनाला ओढ लावतो, तसेच घराला सावरतोही! असाच एक छंदिष्ट लातूरलाही आताशा परिचित झालेला आहे. ‘भारत फेटेवाले’ या नावाने त्यांना सर्वत्र ओळखले जाते.
बारावी नापास झाल्यानंतर पुढे काय करावं, हा प्रश्न होताच. आर्थिक परिस्थितीही बेताचीच. घरचा कर्ता म्हणून काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी हॉटेलचे काम सोडून पुण्याला भावाकडे गेलो. पुण्याचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहेच. या गणेशोत्सवात बांधलेल्या पुणेरी फेट्यांबाबत याच लातूरकराला आकर्षण निर्माण झाले. त्यातून फेटे बांधण्यासाठी चार-चार तास दुकानात थांबून ते पाहिले आणि हा छंद पुढे व्यवसायात रूपांतरित केला. लातुरातील दत्तात्रेय सुभाषराव टोंगळे यांचे वडील हॉटेलवर काम करीत. घरातील मोठा मुलगा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पण त्यात नापास झालो. वडिलांसोबत हॉटेलवर काम करीत करीत एक पानटपरी सुरू केली. त्यातही मन रमेना म्हणून पुढे मोबाईल शॉपी सुरू केली. मध्ये अचानक पुण्यातील गणेशोत्सवासाठी गेलो. तेथील पुणेरी फेटे, त्यांचे हालते तुरे पाहून कुतूहल वाटले. आपल्याला फेटे बांधता येतील का, असा मनाला प्रश्न पडला. त्यातूनच एका फेटेवाल्याच्या दुकानात जाऊन तो बांधत असलेले फेटे तब्बल चार तास उभा राहून पाहिले. तेथून थेट परत गावाकडे आलो. चार महिने सलग घरी फेटे बांधण्याचा सराव केला.
आणि एके दिवशी अचानक एका मित्राचा निरोप आला. नवरदेवाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना फेटे बांधायचे आहेत, कोणी फेटेवाला मिळेल का? आत्मविश्वास जरी असला, तरी ‘हो’ म्हणण्याचे धाडस होईना. पण पुन्हा वाटले प्रयत्न करू. म्हणून नवरदेवासह १० जणांना फेटे बांधण्याचे ५०० रुपये सांगून त्याच्यासोबत गेलो आणि फेटे बांधले.
फेट्याची बांधणी चांगली व सुंदर झाल्यामुळे नवरदेव आणि त्यांचे मित्र खूष झाले आणि त्या अल्पशा अनुभवातून लाखमोलाची प्रेरणा मला मिळाली. त्यानंतर मात्र मागे वळून बघण्याची फुरसत मिळाली नाही. आज १८ वर्षांपर्यंत लग्न, सामाजिक कार्यक्रम, महाविद्यालयीन कार्यक्रम, जयंत्या अशा विविध उपक्रमांतून महिन्यातील २० ते २५ दिवस फेटे बांधणीच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतले आहे. लातुरात आलेल्या राहुल गांधींपासून ते अनेक मान्यवर व्हीआयपींना फेटे बांधून लातूरचे नाव राज्याच्या बाहेरही झळकावले असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकातील भालकी, बीदर, आंध्रातील जहिराबाद आदी ठिकाणीही फेटे बांधण्याचे त्यांनी काम केले आहे. या फेटे बांधणीच्या व्यवसायामुळे बेकारीवर मात केली आहे. दत्तात्रेय टोंगळे म्हणाले, माझ्यासोबत सात जणांना फेटे बांधण्याचे प्रशिक्षण देऊन सोबत घेतले आहे.

Web Title: Strengthening to get unemployed youth due to Puneri Rally