राजकीय आरोपांत रस्त्यांचा धुराळा; जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:53 PM2021-08-24T16:53:55+5:302021-08-24T16:56:38+5:30

रस्त्यांच्या कामांना राजकीय लुडबुडीमुळे ब्रेक लागल्याचे वारंवार होत असलेले आरोप खरे आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे.

Road dust in political allegations; Many road works in the district came to a standstill | राजकीय आरोपांत रस्त्यांचा धुराळा; जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे ठप्प

राजकीय आरोपांत रस्त्यांचा धुराळा; जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देआरोप-प्रत्यारोपांत वाहनचालकांची परवड

- विकास राऊत 

औरंगाबाद : राज्यातील सगळ्याच ठप्प पडलेल्या, संथगतीने सुरू असलेल्या रस्त्यांची कामे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्या लेटरबॉम्बनंतर संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. कामे कुणामुळे थांबली यावरून चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thakare ) यांना पत्र लिहून शिवसैनिकांमुळे रस्त्यांच्या कामांना ब्रेक लागला. त्यांना आवर घाला, अशा सूचना पत्रातून केल्यानंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना राजकीय लुडबुडीमुळे ब्रेक लागल्याचे वारंवार होत असलेले आरोप खरे आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे. या सगळ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये रस्त्यांचा धुराळा उडतो आहे. खड्डेयुक्त आणि अर्धवट रस्त्यांवरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

औरंगाबाद ते जळगाव
मागील चार वर्षांपासून औरंगाबाद ते जळगाव रस्त्याचे काम सुरू आहे. कंत्राटदार बदलूनही या कामाला गती मिळत नाही. १ हजार कोटींतून रस्ता एनएचएआयच्या राज्य कार्यालयाच्या देखरेखीतून करण्यात येत आहे. फुलंब्रीपर्यंत देखील या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.

औरंगाबाद ते धुळे
२०११ पासून साेलापूर - औरंगाबादमार्गे धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ चे काम सुरू आहे. औरंगाबाद ते कन्नडपर्यंत रस्त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. १२०० कोटींहून अधिक कोटींची निविदा या कामासाठी आहे. मध्यंतरी टक्केवारी मागण्याच्या आरोपावरून या रस्त्याचे प्रकरण गाजले होते.

औरंगाबाद ते शिर्डी
औरंगाबाद ते शिर्डी हा तीसगाव मार्गे जाणारा रस्ता एनएच २११ मुळे दुरुस्तीसाठी हाती घेतलाच नाही. बांधकाम विभागाने मध्यंतरी या रस्त्याचे काम केले. दहेगावजवळ दोन कि.मी. रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून राजकीय खोडा आणल्यामुळे पूर्ण होत नाही.

औरंगाबाद ते पैठण
लिंक रोड ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम ८ वर्षांपासून रेंगाळलेले आहे. सुरुवातीला ३५० कोटींतून हा रस्ता करण्यात येणार होता. त्यानंतर एनएचएआयने ९०० कोटींतून काम करण्याच्या अनुषंगाने रस्त्याच्या डीपीआरचे काम हाती घेतले; परंतु अद्याप या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही.

भाजपाचे आरोप
शिवसेनेच्या मतदारसंघात ज्याठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. तेथेच कामांच्या अडचणी आहेत. शिवसैनिकांकडून कंत्राटदारांना चांगली वागणूक मिळत नाही. त्यामुळेच कामांना गती मिळत नाही. ते कशासाठी करतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे.
- संजय केणेकर, शहर जिल्हाध्यक्ष भाजपा

शिवसेनेचे पलटवार असा
जळगाव रस्त्याचे ३ ते ४ वर्षांपासून काम सुरू आहे. शिवसेनेने तेथे कंत्राटदारांना मदत केली; परंतु भाजपाच्या नेत्यांच्या जाचामुळे कंत्राटदार पळून गेला. हप्तेखोरीचा प्रकार शिवसैनिकांनी केलेला नाही. पैठण रोडचा तर काय घोळ चालू हे केंद्र शासनालाच माहिती आहे.
- नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाप्रमुख शिवसेना

काँग्रेसची भूमिका
केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांऐवजी जीएसटीची थकीत रक्कम देण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहावे. जेणेकरून राज्यातील ठप्प पडलेली कामे काही प्रमाणात का होईना सुरळीत होतील. राजकीय आरोप करण्यात काहीही तथ्य नाही. रस्त्याची कामे पैशांअभावी थांबलेली आहेत.
- सुमेध निमगावकर, काँग्रेस प्रदेश सचिव

Web Title: Road dust in political allegations; Many road works in the district came to a standstill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.