औरंगाबाद : जिल्हा परिषद उपकरातून बांधकाम आणि सिंचन विभागाने आरोग्य विभागाला दिलेले प्रत्येकी ५० लाख असा एक कोटींचा निधी पडून आहे. त्यातून दहा आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्याचा ठराव आरोग्य समितीच्या बैठकीत करण्यात आला, तर जिल्हा वार्षिक योजनेतून कोरोनामुळे आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राचे कपात केलेले चार कोटी ६५ लाख परत मिळावे यासाठी ठराव करून त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांच्यामार्फत पाठपुरावा केला जाणार असल्याचे आरोग्य सभापती अविनाश बलांडे यांनी सांगितले.
आरोग्य समितीची मासिक बैठक शुक्रवारी सभापती गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके, डाॅ. उल्हास गंडाळ, डाॅ. विजय कुमार वाघ यांच्यासह आरोग्य अधिकारी, समिती सदस्यांची उपस्थिती होती. जिल्हा वार्षिक योजनेतून मिळणारा निधी, उपकरातून मिळणारा निधी यातून जिल्ह्याच्या बृहत आराखड्यानुसार मंजूर उपकेंद्र दुरुस्ती, नवे बांधण्याची कामे हाती घेतली जातील. त्यासाठी १५ फेब्रवारीपर्यंत नियोजन करण्यात येणार असून, आतापर्यंत मंजूर आरोग्य प्रकल्पांचा आढावा ५ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना लसीकरण, कोरोनाबाधित रुग्ण उपचार, उपाययोजनांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.
---
जिल्ह्यातील खासदार, आमदार, विधान परिषद, राज्यसभेच्या सदस्यांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी पाच आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांची मागणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याचेही बैठकीत ठरले असल्याचे गलांडे यांनी सांगितले.