मुंबईच्या नियमित रेल्वेचा प्रवास ‘वेटिंग’वर, उन्हाळी सुटीत एक साप्ताहिक रेल्वे धावणार, ‘नंदीग्राम’ला वाढविली एक बोगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 20:06 IST2026-04-13T20:06:21+5:302026-04-13T20:06:43+5:30
छत्रपती संभाजीनगरमार्गे मुंबई-हैदराबाद विशेष रेल्वे सुरू; नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने रेल्वेचा निर्णय

मुंबईच्या नियमित रेल्वेचा प्रवास ‘वेटिंग’वर, उन्हाळी सुटीत एक साप्ताहिक रेल्वे धावणार, ‘नंदीग्राम’ला वाढविली एक बोगी
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळी सुट्यांमुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, वंदे भारत एक्स्प्रेस वगळता अन्य रेल्वेचे आरक्षण ‘वेटिंग'वर गेले आहे. उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई (सीएसएमटी) ते हैदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त बोगी जोडण्यात येणार आहे.
२३ एप्रिल ते ९ जुलैदरम्यानने मुंबई (सीएसएमटी) ते हैदराबाद विशेष रेल्वे धावेल. मुंबईहून हैदराबादकडे जाणारी विशेष विशेष रेल्वे (०१०११) ही छत्रपती संभाजीनगर स्थानकावर गुरुवारी सकाळी ७:४० वाजता येईल आणि ७:४५ वाजता पुढे रवाना होईल. तर हैदराबादहून मुंबईला जाणारी विशेष रेल्वे (०१०१२) ही दर शुक्रवारी सकाळी १०:१० वाजता येथे येऊन १०:१५ वाजता मुंबईकडे रवाना होईल. ही रेल्वे सायंकाळी ५:३० वाजता ठाणे, रात्री ८ वाजता मुंबईला पोहोचेल.
बोगींची संख्या १८ वरून १९
मुंबई सीएसएमटी- बल्लारशाह- मुंबई सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त एसी ३-टियर बोगी जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेसची एकूण बोगींची संख्या आता १८ वरून १९ होणार असून, एसी ३-टियर बोगींची संख्या दोनवरून तीनवर पोहोचली आहे. यामुळे प्रवाशांना वातानुकूलित श्रेणीत अधिक राखीव बर्थ उपलब्ध होणार आहेत. मुंबई सीएसएमटी येथून सुटणाऱ्या रेल्वेसाठी ही सुविधा १५ एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध असेल, तर बल्लारशाह येथून सुटणाऱ्या रेल्वेसाठी ही वाढीव बोगी १७ एप्रिल ते १७ मे पर्यंत राहील.