‘आधार’ची नोंदणी पुन्हा होणार सुरू !
By Admin | Updated: November 19, 2014 00:58 IST2014-11-19T00:56:54+5:302014-11-19T00:58:36+5:30
उस्मानाबाद : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी आधार कार्ड नोंदणीची सोय केली होती.

‘आधार’ची नोंदणी पुन्हा होणार सुरू !
उस्मानाबाद : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी आधार कार्ड नोंदणीची सोय केली होती.तेव्हा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १२ लाख १८ हजार ७२३ जणांनी आधार कार्डची नोंदणी केली होती. असे असले तरी आणखी ४ लाख ३८ हजार ८५३ नागरिकांकडे आधार कार्ड नसल्याने ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
बँकेमध्ये खाते उघडायचे असो अथवा शासकीय सवलतींचा लाभ घ्यायचा असो. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने मागील तीन वर्षांपासून आधार कार्ड नोंदणी करण्यात येत आहे. प्रारंभी या नोंदणीस शहरी व ग्रामीण भागातून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, गॅस सिलेंडर, रॉकेल अनुदान आदी बाबींसाठी आधारकार्डची गरज भासू लागल्यानंतर योजनेला खऱ्याअर्थाने गती आली. नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात ४ लाख ६० हजार ६९ तर दुसऱ्या टप्प्यात ७ लाख ५८ हजार ६५४ जणांनी नोंदणी केली. सध्या जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून आधार कार्ड नोंदणी बंद करण्यात आली होती. आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून १२ लाख १८ हजार ७२३ जणांनी आधार कार्डची नोंदणी केली आहे. असे असले तरी अद्यापही जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ८५३ जणांची नोंदणी होणे बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच जिल्ह्यातील आठ तालुक्यात मिळून ३३ ठिकाणी आधार नोंदणी केंद्र पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. याबाबत त्या-त्या तालुक्याच्या तहसीलदारांकडून नियोजन करण्यात येत असून लवकरच आधार कार्ड नोंदणी सुरु करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितली. (प्रतिनिधी)