- बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर: एप्रिल महिन्यात साधारणतः युरिया, डीएपी या रासायनिक खताला फारशी मागणी नसते. मात्र यंदा जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अनेक पटींनी अधिक युरिया आणि डीएपी खताची विक्री झाल्याने केंद्र सरकारच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात सर्वाधिक खतविक्री या दोन जिल्ह्यांत झाल्याने यामागे काळा बाजार किंवा अनियमितता तर नाही ना, याची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने त्रिसदस्यीय पथके दोन्ही जिल्ह्यांत पाठविली होती. खत कारखाने, कृषी अधिकारी आणि खतविक्रेत्यांची भेट घेऊन गुरुवारी हे पथक परतले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दरवर्षी सुमारे पावणेतीन लाख मेट्रिक टन रासायनिक खताची आवश्यकता असते. त्यानुसार कृषी विभाग शासनाकडे मागणी नोंदवितो. मागील वर्षातील वापराचा आढावा घेऊन शासनाकडून जिल्हानिहाय खताचे आवंटन मंजूर केले जाते.
साधारणतः एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९०१ मेट्रिक टन युरियाची विक्री होते. मात्र यंदा तब्बल ७५६६ मेट्रिक टन युरिया विक्री झाला. डीएपी खताचा सरासरी वापर १८२ मेट्रिक टन असताना यंदा २२८७ मेट्रिक टन विक्री झाली. जालना जिल्ह्यातही अशीच स्थिती दिसली. तेथे एप्रिलमध्ये सरासरी १६९० मेट्रिक टन युरिया विक्री होत असताना यंदा ६९५७ मेट्रिक टन युरियाची विक्री वाढली. डीएपीची सरासरी विक्री ६५४ मेट्रिक टन असताना यंदा ती ३१५५ मेट्रिक टनांवर पोहोचली. राज्यात केवळ या दोन जिल्ह्यांतच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खतविक्री झाल्याने केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली. वरिष्ठ अधिकारी संजय कुमार श्रीवास्तव, विश्वजित जे. पटेल आणि दीपक कुमार सिंघल यांच्या पथकाने चौकशी केली.
मागणी वाढण्याची कारणे
पथकाने खत उत्पादक कंपन्या, डीलर्स आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मागील वर्षी ऊसक्षेत्रात झालेली वाढ, उसाची लवकर झालेली तोडणी, मुबलक पाणीसाठा आणि उन्हाळी पिकांचे वाढलेले क्षेत्र यांमुळे युरिया आणि डीएपी खताची मागणी वाढल्याचे कारण अधिकाऱ्यांनी पथकासमोर मांडले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
युरिया विक्री (मेट्रिक टन)
सरासरी विक्री - १,९०१
यंदाची विक्री - ७,५६६
अतिरिक्त विक्री - ५,६६५
डीएपी विक्री (मेट्रिक टन)
सरासरी विक्री - १८२
यंदाची विक्री - २,२८७
अतिरिक्त विक्री - २,१०५
जालना जिल्हा
युरिया विक्री (मेट्रिक टन)
सरासरी विक्री - १,६९०
यंदाची विक्री - ६,९५७
अतिरिक्त विक्री - ५,२६७
डीएपी विक्री (मेट्रिक टन)
सरासरी विक्री - ६५४
यंदाची विक्री - ३,१५५
अतिरिक्त विक्री २,५०१
Web Summary : Jalna and Sambhajinagar saw unusual urea sales, raising concerns. Central teams investigated potential black market activity due to significantly increased demand for fertilizers. Increased sugarcane farming cited as a reason.
Web Summary : जालना और संभाजीनगर में असामान्य यूरिया बिक्री से चिंता बढ़ी। उर्वरकों की मांग में भारी वृद्धि के कारण केंद्रीय टीमों ने संभावित काला बाजारी की जाँच की। गन्ने की खेती में वृद्धि को कारण बताया गया।