भीमजयंतीला यंदा रेकॉर्डब्रेक गर्दी; 'जयभीम'च्या गगनभेदी जयघोषात शहरभर उसळले निळे चैतन्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 12:31 IST2026-04-15T12:30:56+5:302026-04-15T12:31:41+5:30
मंगळवारी सूर्य मावळतीला जात असताना क्रांती चौकात प्रज्ञासूर्याच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. पाहता-पाहता आंबेडकरी अनुयायांचे निळे तुफानच रस्त्यावर उतरले.

भीमजयंतीला यंदा रेकॉर्डब्रेक गर्दी; 'जयभीम'च्या गगनभेदी जयघोषात शहरभर उसळले निळे चैतन्य
छत्रपती संभाजीनगर : 'जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा', अशा गगनभेदी घोषणा देत आबालवृद्ध महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवगीतांवर बेधुंद होऊन थिरकले. मंगळवारी शहरात भीमजयंतीचा अमाप उत्साह पाहायला मिळाला. क्रांती चौक ते सिटी चौक या रस्त्यावर अक्षरशः निळे चैतन्य पसरले होतेच; परंतु शहरातून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वेगवेगळ्या वसाहतींमधून भीमरथ पुढे सरकत होते.
बोधिसत्त्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शहरातून जल्लोषात मिरवणूक निघत असते. पण, यंदाचा जल्लोष काही औरच होता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांचेच चेहरे आनंद आणि अभिमानाने खुलून दिसत होते. प्रत्येक स्टेज आणि भीमरथावर 'डीजे'च्या गीतांवर प्रत्येकजण थिरकताना दिसत होता. क्रांती चौक, सिल्लेखाना आणि पैठणगेट चौक डीजेने दणाणून गेले होते. क्रांती चौक आणि सिल्लेखाना चौकात पोलिसांचे दोन-दोन टेहळणी चबुतरे होते. डीजेचा आवाज अचानक वाढल्यानंतर प्रत्येकजण कानांवर बोटे ठेवून पुढे जाताना दिसून आले. मिरवणुकीत सहभागी भीमरथावर समाजाला संदेश देणारे देखावे लक्षवेधी ठरले. क्रांती चौकात पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा स्वागतमंच होता. त्यावर सूर्यकांता गाडे, डॉ. सिद्धान्त गाडे हे उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करीत होते.
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अॅड. पंकज बनसोडे, राहुल मकासरे तसेच 'वंचित' महिला आघाडी, पैठण गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमितीचे दिनकर ओंकार, मिलिंद दाभाडे, विजय मगरे, गौतम लांडगे त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, रिपाइं (डेमॉक्रॅटिक), दलित पँथर, रिपाइंने स्वागतमंच उभारून मिरवणुकीत सहभागी उत्सव समिती पदाधिकाऱ्यांचे स्वागत करीत होते.
क्षणचित्रे....
आग ओकणारा सूर्य शांत होताच सायंकाळी मिरवणूक मार्गात नागरिकांची गर्दी वाढली.
शहरातील विविध भागांसह ग्रामीण भागांतील भीमसैनिक मिरवणूक पाहण्यासाठी आले.
मालेगाव, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली येथील डीर्जेचा मिरवणुकीत सहभाग.
मिरवणुकीचा मार्ग विविध रंगांच्या 'लेसर लाइट'नी न्हाऊन निघाला.
क्रांती चौक ते भडकल गेटदरम्यान विविध पक्ष, संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत स्टेज.
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संपूर्ण मिरवणूक मार्ग गर्दीने फुलून गेला. पाय ठेवायलाही जागा नव्हती.
लिहिलेले, डोक्यावर निळी टोपी, हातात झेंडा आणि ओठांवर घोषणा. अनेकांच्या शर्टवर 'जय भीम'
शुभ्र वस्त्रे परिधान करून तरुण-तरुणी, महिला-पुरुष मिरवणुकीत सहभागी. विविध संस्था, संघटनांतर्फे पाणी, अन्न वाटप.
मिरवणूक मार्गात तरुणाई रील्स बनविण्यात मग्न.