जिल्ह्यातील रेशन दुकानांवर डाळीचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST2021-02-05T04:13:57+5:302021-02-05T04:13:57+5:30

दुकानदारांचे नियतन लांबले : मोफत तांदूळ पुरवठाही झाला बंद विकास राऊत लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : जिल्ह्यातील रेशन दुकानांवर ...

Pulses chill at ration shops in the district | जिल्ह्यातील रेशन दुकानांवर डाळीचा ठणठणाट

जिल्ह्यातील रेशन दुकानांवर डाळीचा ठणठणाट

दुकानदारांचे नियतन लांबले : मोफत तांदूळ पुरवठाही झाला बंद

विकास राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : जिल्ह्यातील रेशन दुकानांवर नियतन लांबल्यामुळे डाळींचा ठणठणाट आहे. डिसेंबरपर्यंतचा धान्य कोटा पुरवल्यानंतर पुढील तीन महिन्यांचा कोटा न दिल्यामुळे सध्या रेशन दुकानांवर डाळीचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र शासनाने दिलेल्या कोट्याचे वाटप झाले आहे. राज्य ग्राहक फेडरेशनकडे वाटपाची जबाबदारी आहे. सध्या पुढील वाटपाची तारीख जाहीर झालेली नसल्यामुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणच्या रेशन दुकानांवर डाळीचे वाटप होत नसल्याचे वृत्त आहे.

जिल्ह्यात १ हजार ८०१ स्वस्त धान्य दुकाने असून, ७ लाख ३२ हजार ४४४ कार्डधारकांची संख्या आहे. यातील प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजना तसेच अंत्योदय योजनेतील शेतकरी असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारक आहेत. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील शेतकरी खात्यांची संख्या ७८ हजार २८०, अंत्योदय अन्न योजनेतील ६५ हजार ४८२ तर प्राधान्य कुटुंबातील ४ लाख ८ हजार ४० असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारक आहेत.

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने - १ हजार ८०१

एकूण शिधापत्रिकाधारक - ७ लाख ३२ हजार ४४४

पिवळे शिधापत्रिकाधारक - ६५ हजार ४८२

केशरी शिधापत्रिकाधारक - ४ लाख ८ हजार ४०

पांढरे शिधापत्रिकाधारक - ३ लाख २४ हजार ४०४

रेशनवर काय मिळते

रेशन दुकानांवर सध्या फक्त गहू, तांदूळ आणि साखर मिळत आहे. याशिवाय दुसरे कुठलेही धान्य दुकानातून दिले जात नाही. शासनाने सध्या मका खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. पुढील महिन्यापासून मका वाटप होणे शक्य आहे. मोफत तांदळाचे वाटप नोव्हेंबर २०२०पासून बंद केले आहे.

डाळ मिळत नसल्याच्या तक्रारी कुठे

रेशन दुकानांवर औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातही डाळ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. दुकानदारांना डाळ खरेदीसाठी पुरवठा विभाग चालानच देत नाही. त्यामुळे डाळपुरवठा होत नाही, असे एका दुकानदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाले

प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांनी सांगितले, डाळीचा पुरवठा कुठे-कुठे झाला आहे किंवा नाही, याची माहिती घ्यावी लागेल. याविषयीची माहिती घेऊनच याबाबत सांगता येईल.

Web Title: Pulses chill at ration shops in the district