सातारा-देवळाई न.प.ला भरीव निधी देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची तयारी
By Admin | Updated: September 10, 2014 00:52 IST2014-09-10T00:31:27+5:302014-09-10T00:52:57+5:30
औरंगाबाद : जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी नव्याने स्थापन झालेल्या सातारा- देवळाई नगर परिषदेला विकासकामांसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून (डीपीडीसी) भरीव निधी देण्याची तयारी दर्शविली आहे.

सातारा-देवळाई न.प.ला भरीव निधी देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची तयारी
औरंगाबाद : जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी नव्याने स्थापन झालेल्या सातारा- देवळाई नगर परिषदेला विकासकामांसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून (डीपीडीसी) भरीव निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. नगर परिषदेच्या हद्दीत करावयाच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासकांना दिल्या आहेत.
औरंगाबाद शहरालगतच्या सातारा आणि देवळाई भागासाठी राज्य सरकारने नगर परिषद स्थापन केली आहे. तहसीलदार विजय राऊत यांनी चार दिवसांपूर्वीच नगर परिषदेच्या प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर आता या भागात विकासकामे सुरू करण्याची मागणी होत आहे. सातारा- देवळाई भागात पिण्याच्या पाण्यासह रस्ते, ड्रेनेज, अतिक्रमणे, साफसफाई, असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी या नगर परिषदेच्या हद्दीत विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी)मधून निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी प्रशासक विजय राऊत यांना विकासकामांचे प्रस्ताव तयार करून ते जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत, अशा सूचनाही दिल्या आहेत. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले की, सातारा-देवळाई नगर परिषदेच्या हद्दीत खूप कामे करावी लागणार आहेत. पाणीपुरवठा योजना किंवा इतर मोठ्या कामांसाठी केंद्र किंवा राज्य सरकारकडूनच निधी मिळू शकतो; पण तोपर्यंत इतर लहान-मोठी विकासकामे करण्यासाठी डीपीडीसीतून निधी देता येतो. त्यामुळे प्रशासकांना तसे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. प्रस्ताव आले तर या नगर परिषदेला येत्या काळात तीन-चार कोटी रुपयांचा निधी देऊ शकेल, असेही ते म्हणाले.