प्रवासी वाढवा अभियान थंडावले

By Admin | Updated: September 15, 2014 00:57 IST2014-09-15T00:56:50+5:302014-09-15T00:57:26+5:30

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ राबविण्यात येत आहे.

Passenger Expansion Campaign Stalled | प्रवासी वाढवा अभियान थंडावले

प्रवासी वाढवा अभियान थंडावले


औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ राबविण्यात येत आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाच्या सुरुवातीच्या महिनाभरात विविध मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढली; परंतु गेल्या काही दिवसांपासून हे अभियान थंडावल्याचे चित्र दिसत आहे.
१ आॅगस्टपासून प्रवासी वाढवा विशेष अभियानास सुरुवात झाली. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारास, विभागास आणि वाहकास रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे अभियानात यशस्वी कामगिरी करून पारितोषिक मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कंबर कसली. या अभियानात सेवेचा दर्जा वाढविणे, उत्पन्न वाढविणे, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन प्रवाशांना एसटी बसेसच्या प्रवासाकडे वळविण्याची सूचना करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या या अभियानात दोन महिन्यांचे नियोजन करण्यात आले; परंतु अभियानाच्या सुरुवातीच्या काही दिवसांनंतर मात्र, प्रवासी वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात काहीसे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येते. आगाराची स्वच्छता, बसेसची स्वच्छता यासह अभियानात करण्यात आलेल्या अनेक सूचनांकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
अभियानाचे केवळ १५ दिवस शिल्लक आहेत. पक्ष पंधरवड्यामुळे सध्या प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे अनेक मार्गांवरील बसगाड्या रद्द करण्याची वेळ येत आहे. तरीही अभियानात अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे मध्यवर्ती बसस्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
८० लाख रुपयांचे उत्पन्न
आॅगस्ट महिन्यात राखीपौर्णिमेनिमित्त विभागास ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी राखीपौर्णिमेनिमित्त विभागास जवळपास ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यामध्ये ३० लाख रुपयांनी वाढ झाली. याशिवाय स्वातंत्र्य दिनाची सुटी आणि त्यानंतर शनिवार, रविवार आल्याने सलग सुटी घेऊन विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याचा अंदाज घेऊन विभागातर्फे जादा बसेसचे नियोजन करण्यात आले. प्रवासी वाढवा अभियानासाठी आॅगस्ट महिना महत्त्वपूर्ण ठरला; परंतु सप्टेंबर महिन्यात या उलट परिस्थिती दिसून येत आहे.

Web Title: Passenger Expansion Campaign Stalled