बदली कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश

By Admin | Updated: December 2, 2014 01:09 IST2014-12-02T01:00:22+5:302014-12-02T01:09:44+5:30

औरंगाबाद : मनपातील सफाई कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी दुसरेच बदली कर्मचारी शहराची सफाई करून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत.

Order to search for replacement workers | बदली कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश

बदली कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश


औरंगाबाद : मनपातील सफाई कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी दुसरेच बदली कर्मचारी शहराची सफाई करून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. बदली कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिल्याचे आयुक्त पी.एम. महाजन यांनी सांगितले.
मनपा कर्मचाऱ्यांनी ५.३० वा. कामावर हजर राहणे गरजेचे आहे. ६.३० वाजेपर्यंत सफाईचा एक राऊंड झाला पाहिजे. त्यानंतर वर्दळ सुरू होते. त्यामुळे सफाई करता येत नाही. साफसफाईचा आढावा घेताना अनेक ठिकाणी बदली कामगार असल्याचे आढळून आले.
सफाई विभागातील अनेक कर्मचारी दुसरीकडे काम करीत आहेत, तर काही अधिकाऱ्यांच्या दिमतीला आहेत. त्यामुळे कोण कुठे सफाई करतो आहे, याची माहितीही आयुक्तांनी मागविली आहे. रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी दुभाजक असतात. त्यामध्ये नागरिकांनी कचरा आणून टाकणे चांगले नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगली पाहिजे. दुकानदारांनी रात्री दुकान बंद करतानाच कचरा बाहेर टाकला पाहिजे. जेणेकरून तो सकाळी पहिल्या टप्प्यातच उचलला जाईल. ते दिवसा कचरा आणून टाकतात. तो वारंवार उचलला जात नसल्यामुळे तसाच पडून राहतो, असे आयुक्त म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आलेल्या स्वच्छता अभियानामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली असून त्याचा फायदा झाला आहे. नगरसेवक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था स्वच्छतेच्या मोहिमांमध्ये सहभागी होत आहेत. जनजागृती होत असून नागरिकांना आता जाणीव होत असल्याचे आयुक्त महाजन म्हणाले.
रोशनगेट परिसरात आयुक्त महाजन स्वच्छतेची पाहणी करीत असताना एक अजब माहिती समोर आली होती. दुभाजकावर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यास आयुक्तांनी विचारले, ‘तू इथं केव्हापासून काम करतो आहेस’, त्या कर्मचाऱ्याला ते आयुक्त आहेत हे माहिती नसावे.
त्याने सांगितले, मी आज बायकोच्या जागी सफाई करीत आहे. मी व माझी बायको दोघेही मनपा सेवेत असल्याचेही त्याने आयुक्तांना सांगितले. आयुक्तांना हा प्रकार कळल्यानंतर ते अवाक् झाले होते. आयुक्तांनी त्याला नाव विचारले, त्याने चुकीचे नाव सांगून वेळ मारून नेली होती. मात्र, आज आयुक्तांनी त्या कर्मचाऱ्याचे नाव, तो व त्याची बायको पालिका सेवेत केव्हापासून आहेत, याची माहिती आस्थापना विभागाकडून मागविली आहे.

Web Title: Order to search for replacement workers