अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट आहार, अस्वच्छता आढळल्यास जागेवरच निलंबन; झेडपी सीईओ यांची तंबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:25 IST2026-05-12T11:23:18+5:302026-05-12T11:25:02+5:30
गंगापूर व वैजापूर पंचायत समित्यांतील स्वच्छता आणि कार्यालयीन नीटनेटकेपणाबाबत नाराजी

अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट आहार, अस्वच्छता आढळल्यास जागेवरच निलंबन; झेडपी सीईओ यांची तंबी
छत्रपती संभाजीनगर : शाळा तसेच अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट आहार किंवा अस्वच्छता आढळून आल्यास पर्यवेक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती तसेच मुख्याध्यापकांना जागेवरच निलंबित करू, असा निर्वाणीचा इशारा जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी सोमवारी विभागप्रमुखांच्या समन्वय सभेत दिला.
मिन्नू यांनी विभागप्रमुखांना सांगितले की, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये स्वच्छ राखा. वापरात असलेली शौचालये, पिण्याच्या पाण्याची व विजेची सुविधा आवश्यक आहे. विशेषतः शाळा व अंगणवाड्यांमधील मुला-मुलींच्या शौचालयांची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि स्वच्छता ही शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी. ग्रामपंचायतींच्या दहा टक्के निधीतून ही कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अधिकारी फिल्डवर असतील तर तसे नोंदवहीत नमूद करा. लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या पत्रांना सात दिवसांत उत्तर देण्याच्या सूचना देत मिन्नू यांनी मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध योजना, घरकुल योजना, रोहयो, मातोश्री पाणंद रस्ते, वृक्षलागवड, नाला सरळीकरण आणि गाळमुक्त अभियानाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक तालुक्यात किमान २५ ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागातून गाळमुक्त अभियान राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. घरकुल योजनांसाठी गायरान जमिनी नियमित करण्याबाबत तहसीलदार, एसडीएम आणि गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वय साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
जि.प.च्या वेरूळ सभागृहात झालेल्या समन्वय सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, अनुपमा नंदनवनकर, डॉ. ओमप्रकाश रामावत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, अश्विनी लाठकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगल पांचाळ, कार्यकारी अभियंता शाम वारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दोन पं. स. बाबत नाराजी
गंगापूर व वैजापूर पंचायत समित्यांतील स्वच्छता आणि कार्यालयीन नीटनेटकेपणाबाबत नाराजी व्यक्त करत फायलींचे ‘अ, ब, क, ड’ वर्गीकरण, कालबाह्य फाइलींचे निर्लेखन आणि निरुपयोगी वस्तू हटविण्याचे आदेश देण्यात आले.