आॅक्टोबर ‘हिट’ अन् विजेचा लपंडाव
By Admin | Updated: October 7, 2014 00:42 IST2014-10-07T00:39:36+5:302014-10-07T00:42:56+5:30
कन्नड : तळपणारा सूर्य, वाढलेली उष्णता अन् डोळ्यांसमोर वाळत चाललेली पिके, यामुळे आधिच वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपांचा सहारा घेतला,

आॅक्टोबर ‘हिट’ अन् विजेचा लपंडाव
कन्नड : तळपणारा सूर्य, वाढलेली उष्णता अन् डोळ्यांसमोर वाळत चाललेली पिके, यामुळे आधिच वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपांचा सहारा घेतला, तर विजेचा लपंडाव, कमी दाबाने वीज, यात बळीराजा पुरता भरडून निघत आहे. त्यामुळे अगदी हातातोंडाशी आलेल्या पिकांची वाताहत आता बघवत नसल्याच्या प्रतिक्रीया शेतकरी हताश होऊन देत आहेत.
आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापलेले आहे; मात्र शेतकऱ्यांचे तिकडे चित्त लागत नाही. एक तर यावर्षी सरासरी पर्जन्यमानाइतका पाऊस झालेला नाही, त्यामुळे बोटावर मोजण्याइतकीच धरणे पूर्ण क्षमतेने भरली. बहुतांशी जलसाठ्यांमध्ये वाढ होऊ शकली नाही. उशिरा आलेल्या पावसामुळे उशिरा पेरणी झाली. यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार, यात शंकाच नव्हती; तरीही काही ना काही पीक हातात पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खर्च केला. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत बऱ्यापैकी पाऊस पडला; मात्र त्यानंतर पाऊस उघडला आणि वातावरण एकदमच बदलले. कडक ऊन पडू लागले. पिके ऊन धरू लागली. विहिरीत उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपसा करून पिकांना पाणी देण्याची धडपड शेतकऱ्यांनी सुरू केली; विजेच्या लपंडावामुळे या मनसुब्यावरही पाणी फिरले.