'राजू शिंदेंनी मनपा निवडणूक लढवावी'; शिरसाटांनी वाक् बाण सोडत करून दिली ताकदीची जाणीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:37 IST2025-11-20T19:36:05+5:302025-11-20T19:37:36+5:30
शिंदे हे उद्धवसेनेतून पुन्हा भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रतिक्रिया द्यावी, असे काही वाटत नाही.

'राजू शिंदेंनी मनपा निवडणूक लढवावी'; शिरसाटांनी वाक् बाण सोडत करून दिली ताकदीची जाणीव
छत्रपती संभाजीनगर : शिंदे यांनी आता पश्चिममधून किंवा कुठूनही मनपा निवडणूक लढवावी, अशा खोचक सल्ल्यासह त्यांना पुढील भवितव्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या.
भाजपमधून बाहेर पडून विधानसभा निवडणूक लढवून पराभूत झालेले राजू शिंदे १० महिन्यांनंतर मंगळवारी (दि.१८) पुन्हा भाजपमध्ये परतले. यावेळी शिंदेंनी उद्धव व शिंदेसेना संपविण्याचे सूर आवळल्याने शिंदेसेनेचे राज्याचे प्रवक्ता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वाक् बाण सोडत शिंदेंना त्यांच्या ताकदीची जाणीव करून दिली.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले, शिंदे हे उद्धवसेनेतून पुन्हा भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रतिक्रिया द्यावी, असे काही वाटत नाही. तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. पक्षवाढीसाठी त्यांना चांगला मोठा नेता भेटला आहे. पक्षवाढीसाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. शिंदे यांनी मनपा निवडणुकीत पश्चिममधून अथवा अन्य कुठूनही यावे आणि पुन्हा निवडणूक लढवावी. शिंदे यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
भाजप-सेनेत अंतर्गत प्रवेशांवर बंंधने....
शिंदेसेनेने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते घ्यायचे नाहीत, भाजपने शिंदेसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते घ्यायचे नाहीत, असे महायुतीमध्ये मंगळवारी ठरले आहे. त्यामुळे यापुढे आमच्यातील अंतर्गत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे व इतर कुणाचेही प्रवेश हाेतील, असे वाटत नाही. शिंदेसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर या भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. यावर पालकमंत्री म्हणाले, वाडकर यांनादेखील भाजपमध्ये प्रवेश मिळेल, असे वाटत नाही.