छत्रपती संभाजीनगरात एनआयएची धाड; एकाला घेतले चौकशीसाठी ताब्यात
By बापू सोळुंके | Updated: December 12, 2024 20:06 IST2024-12-12T20:06:40+5:302024-12-12T20:06:57+5:30
एटीएसच्या कार्यालयात त्याची दिवसभर चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगरात एनआयएची धाड; एकाला घेतले चौकशीसाठी ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय तपास एजन्सी अर्थात एनआयएने बुधवारी (दि. ११) मध्यरात्रीनंतर बीड बायपास परिसरातील एका मदरशावर धाड टाकली. एनआयएच्या पथकाने मदरशाची सुमारे चार तास झाडाझडती घेतली. गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास २२ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. एटीएसच्या कार्यालयात त्याची दिवसभर चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एनआयएने काही दिवसांपूर्वी दिल्लीत कारवाई करीत जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित एकाला अटक केली आहे. अटकेपूर्वी हा दहशतवादी देशभर फिरला होता. तो जेथे जेथे गेला त्या देशभरातील सर्व १९ ठिकाणी एनआयएने बुधवारी रात्री एकाचवेळी धाडी टाकल्या. यात छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपासलगत असलेल्या एका अरबी मदरशाचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की, रात्री १.३० वाजता एनआयएचे पथक स्थानिक पाेलिसांच्या मदतीने या मदरशात गेले. पोलिसांना बाहेर ठेवून एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रात्री २ ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत मदरशाची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत मदरशाचे प्रमुख आणि तेथील काही तरुणांची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर दोन मोबाइल आणि एका तरुणाला ताब्यात घेऊन एनआयएचे पथक तेथून बाहेर पडले. यानंतर त्या तरुणाला दहशतवादविरोधी पथकाच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे या तरुणाची दिवसभर अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती एनआयए अथवा स्थानिक पोलिसांनी दिली नाही.
शहरात यापूर्वी कारवाया
एनआयएच्या पथकाने यापूर्वी शहरातील किराडपुरा परिसरात काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली होती. यानंतर या तरुणांना सोडून देण्यात आले होते. आता या प्रकरणांत त्या तरुणाचा दहशतवाद्यांशी संबंध असेल तर त्याच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.