भूमिगतच्या ठेकेदारास महापालिकेची नोटीस

By Admin | Updated: February 9, 2016 00:32 IST2016-02-09T00:19:24+5:302016-02-09T00:32:39+5:30

औरंगाबाद : काचीवाडा येथील बालकाच्या मृत्यूप्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या भूमिगत गटार योजनेच्या

Municipal Corporation Notice to Underground Contractor | भूमिगतच्या ठेकेदारास महापालिकेची नोटीस

भूमिगतच्या ठेकेदारास महापालिकेची नोटीस


औरंगाबाद : काचीवाडा येथील बालकाच्या मृत्यूप्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. याप्रकरणी तातडीने खुलासा करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.
मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशावरून सोमवारी दुपारी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी नाल्यात खोदलेल्या खड्ड्यात बुडून शनिवारी सायंकाळी काचीवाडा भागात आकाश जाधव या नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ठेकेदाराने नाल्यात सामान उतरविण्यासाठी याठिकाणची संरक्षक भिंत तोडली होती; परंतु नंतर ती बांधण्याचे किंवा त्याठिकाणी पत्रे अथवा लाकडी फळ्या लावण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे खेळता खेळता नाल्यात उतरून त्यातील खड्ड्यात पडल्याने आकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवर रविवारी रात्री उशिरा सिटीचौक पोलीस ठाण्यात खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मनपा प्रशासनानेही सोमवारी निष्काळजीपणाबद्दल कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशावरून दुपारी कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही नोटीस देण्यात आली. यामध्ये कंपनीकडून काम करताना निष्काळजीपणा होत असून, ही निष्काळजी जीवित हानीला कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले आहे. काचीवाडा प्रकरणात निष्काळजीपणा का झाला याचा खुलासा तातडीने करण्याचे आदेश या नोटिसीत देण्यात आले आहेत.
(अधिकारी, पीएमसीवरही कारवाईची मागणी/२ वर)

Web Title: Municipal Corporation Notice to Underground Contractor