मोगरा 'भाव' खातोय! लग्नसराईमुळे दर पोहोचले १००० रुपयांवर; उन्हाच्या झळांनी उत्पादन घटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:29 IST2026-05-11T12:28:23+5:302026-05-11T12:29:56+5:30
लग्नांमध्ये वधूसाठी मोगऱ्याचे खास गजरे, फुलांचे दागिने, स्टेज सजावट आणि वरमालांमध्येही मोगऱ्याला मोठी मागणी असते.

मोगरा 'भाव' खातोय! लग्नसराईमुळे दर पोहोचले १००० रुपयांवर; उन्हाच्या झळांनी उत्पादन घटले
छत्रपती संभाजीनगर : उन्हाच्या तीव्र झळांमुळे मोगऱ्याचे उत्पादन घटले आहे. त्यातच मे महिन्यातील लग्नसराईमुळे मागणी अचानक वाढल्याने बाजारात मोगरा ‘भाव’ खातो आहे. महिनाभरापूर्वी ३०० ते ५०० रुपये किलो दराने मिळणारा मोगरा आता दुप्पट दराने म्हणजे किलोमागे तब्बल ८०० ते १ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
विशेष म्हणजे, लग्नांमध्ये वधूसाठी मोगऱ्याचे खास गजरे, फुलांचे दागिने, स्टेज सजावट आणि वरमालांमध्येही मोगऱ्याला मोठी मागणी असते. त्यामुळे डेकोरेटर्स आणि फूल विक्रेत्यांचे गणितच बिघडले आहे. “पूर्वी एका लग्न समारंभासाठी सहज तीन-चार किलो मोगरा वापरला जायचा; आता ग्राहक अर्ध्या किंवा एक किलोमध्येच काम भागवत आहेत,” असे फूल विक्रेत्यांनी सांगितले.
दरवाढ असूनही “लग्नात मोगऱ्याचा सुगंध हवाच,” अशी भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे महागाईच्या काळातही मोगऱ्याची क्रेझ कायम आहे. भाव वधारल्याने मोगऱ्याचा सुगंध लग्नसमारंभात दरवळण्यासाठी वर-वधूच्या माता-पित्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
दररोज १ टन मोगऱ्याची आवक
लग्नसराईचा हंगाम अंतिम टप्यात येऊन ठेपला आहे. शहरात नांदेड, मुदखेड, परभणी या भागातून रेल्वेने मोगऱ्याची दररोज ८ ते १० क्विंटल (१ टन) पर्यंत आवक होत आहे. यात झेला व सुटा मोगरा असे दोन पद्धतीने मोगरा विकला जात आहे, तर मोगऱ्याचा एक गजरा २० रुपयांपर्यंत विकला जात आहे. लग्नात महिलांना देण्यासाठी खास १०० ते २०० गजरे विकत घेतले जात आहेत.
-बबलूशेठ, व्यापारी
लग्नाच्या दोनच तारखा शिल्लक
आता या हंगामातील लग्नाच्या मुख्य तारखा दोनच शिल्लक राहिल्या आहेत. यात बुधवार (दि.१३) व गुरुवार (दि.१४) या तारखा असून, पुढे रविवार (१७ मे) पासून अधिक ज्येष्ठ मासाला सुरुवात होत आहे. महिनाभर मंगलकार्याला ब्रेक लागणार आहे. यामुळे या दोन दिवसातच मोगऱ्याला भाव राहील, नंतर मोगऱ्याचा सुगंध ग्राहकांना स्वस्तात घेता येईल.
-रवी माळी, व्यापारी