मराठवाडा आटतोय, ५१ तालुक्यांवर जलसंकट गडद, टँकरचा आकडा १ हजाराच्या उंबऱ्यावर

By विकास राऊत | Published: April 8, 2024 01:00 PM2024-04-08T13:00:08+5:302024-04-08T13:00:24+5:30

भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर घट, मागील ५ वर्षांच्या भूजल पातळीशी तुलना केल्यानंतर मार्च २०२४ मध्ये भूजल पातळी ही ८.१८ मीटर दिसून आली.

Marathwada water level shrinking, 51 talukas are facing water crisis, the number of tankers is around 1 thousand | मराठवाडा आटतोय, ५१ तालुक्यांवर जलसंकट गडद, टँकरचा आकडा १ हजाराच्या उंबऱ्यावर

मराठवाडा आटतोय, ५१ तालुक्यांवर जलसंकट गडद, टँकरचा आकडा १ हजाराच्या उंबऱ्यावर

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील भूजल पातळी दिवसेंदिवस घटत चालली असून ५१ तालुक्यांवर जलसंकट आहे. ९७९ टँकरने विभागात पाणीपुरवठा सुरू असून येत्या १० दिवसांत १ हजारांच्या पुढे टँकरचा आकडा जाईल, अशी चिन्हे आहेत. तापमान वाढत असल्यामुळे भूजलावर परिणाम होत आहे.

गेल्या मान्सूनमध्ये १५ टक्के मान्सून कमी झाल्यामुळे भूजल पातळी खालावली. मराठवाड्याची भूजल पातळी सरासरी ०.९८ मीटरने घटली. २०१६-१७ साली अशीच परिस्थिती विभागात होती. ७६ पैकी ५१ तालुक्यांत भूजल पातळीवर परिणाम झाला आहे. सर्वाधिक २.२८ मीटर भूजल पातळी परभणी तर त्याखालोखाल २.१३ मीटर लातूर जिल्ह्याची घटली आहे. मराठवाड्यात २०२० ते २०२२ या तीन वर्षांत सलग अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, मात्र भूजलस्तर वाढला. २०२३च्या मान्सूनचे उशिराने आगमन झाले, जून ते सप्टेंबर या काळात सरासरी ८४.५५ टक्के पाऊस झाला. ६७५.४३ पावसाची नोंद झाली. मान्सूनमध्ये १५.४५ टक्क्यांची घट झाली. परभणी, धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांत कमी पाऊस झाला. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.

भूजल सर्वेक्षण विभागाने विभागातील ८७५ विहिरींची पाणी पातळी तपासली. मागील ५ वर्षांच्या भूजल पातळीशी तुलना केल्यानंतर मार्च २०२४ मध्ये भूजल पातळी ही ८.१८ मीटर दिसून आली. सरासरी पाणीपातळी ही ९.१६ असते. यावरून यावर्षी भूजल पातळीत ०.९८ मीटरची घट दिसून आली. मराठवाड्यातील ७६ पैकी ५१ तालुक्यांत भूजल पातळी घटली असून, १८ तालुक्यांत ० ते १ मीटर, १५ तालुक्यांत १ ते २ मीटर, १४ तालुक्यांत २ ते ३ मीटर तर ४ तालुक्यांत ३ मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे. परभणी जिल्ह्यातील ९ पैकी ८ तालुक्यांत भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात भूजलस्तर चांगला आहे. नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १३ आणि हिंगोली जिल्ह्यातील ५ पैकी ३ तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ झाली. नांदेडमध्ये ०.२२ तर हिंगोलीत ०.०१ मीटरने वाढ झाली.

जिल्हा................... विहिरी तपासणी......... भूजल घट
छत्रपती संभाजीनगर.........१४१............................१.१७
जालना .........११० ......................................०.०२
परभणी............ ८६ .................................२.२८
लातूर ...............१०९...................................२.१३
धाराशिव .........११४ ....................................१.७४
बीड....................१२६ ..................................०.४४
हिंगोली ..........५५..................................०.०१ (वाढ)
नांदेड................. १३४ ..............................०.२२ (वाढ)
एकूण ....................८७५ .................................०.९८

Web Title: Marathwada water level shrinking, 51 talukas are facing water crisis, the number of tankers is around 1 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.