औरंगाबाद : ‘गाव तेथे रिपाइं’ या धोरणानुसार जिल्ह्यातील गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावर पक्षाची अधिकाधिक सदस्य नोंदणी करा, असे आवाहन या पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी केले.
सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीत कदम यांनी सदस्य नोंदणीबाबत सांगितले की, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार देशात १ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त सदस्य नोंदणीसाठी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत. वाडी, वस्त्या, तांड्यावर जाऊन विविध जाती-धर्माच्या नागरिकांना रिपाइंशी जोडून हा पक्ष अधिक व्यापक करावा.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात रिपाइंचे ७० सदस्य निवडून आले आहेत. या बैठकीत बाबूराव कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीबाबतही जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची व्यूहरचना आखली जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
यावेळी मिलिंद शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, अरविंद अवसरमोल, प्रशांत शेगावकर, बाळकृष्ण इंगळे, विजय मगरे, मुकेश गायकवाड या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाभरातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.