छ. संभाजीनगर मनपाचा मोठा 'हॅमर'; सेव्हन हिल ते दर्गा चौकापर्यंत १४४ अतिक्रमणे जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:58 IST2026-04-30T15:57:22+5:302026-04-30T15:58:14+5:30
वकिलांचा विरोध अन् व्यापाऱ्यांची गयावया; मात्र अतिक्रमण हटाव पथक ठाम, सेव्हन हिल परिसराने घेतला मोकळा श्वास.

छ. संभाजीनगर मनपाचा मोठा 'हॅमर'; सेव्हन हिल ते दर्गा चौकापर्यंत १४४ अतिक्रमणे जमीनदोस्त
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने बुधवारी सेव्हन हिल ते शहानूरमियाँ दर्गा चौकापर्यंत अतिक्रमण हटाव मोहिमेत १४४ पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे जमीनदोस्त केली. कारवाईला अनेक ठिकाणी विरोध झाला. मोठा पोलिस बंदोबस्त आणि नागरी मित्र पथकामुळे विरोध मावळला. माठ विक्रेत्यांचे सामान व लहान-मोठ्या लाेखंडी टपऱ्यांचा जागेवर चेंदामेंदा करण्यात आला. सायंकाळी आयुक्त अमोल येडगे यांनी कारवाईची पाहणी केली.
महापालिकेने यापूर्वी अनेकदा या रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. कारवाईनंतर परत काही दिवसांनी अतिक्रमणे जशास तशी उभी राहतात. बुधवारी सकाळी ११ वाजता अचानक सेव्हन हिल येथे मनपाचे पथक दाखल झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे काढायला सुरुवात केली. अगोदर सेव्हन हिल चौकाचा कोंडलेला श्वास मोकळा केला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर उभारलेले शेड तोडायला सुरुवात केली. सेव्हन हिल येथे दोन वकिलांनी विरोध दर्शविताना स्थगिती आदेश दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनपा अधिकाऱ्यांनी तो अमान्य करीत कारवाई केली. त्यानंतर गजानन महाराज मंदिराजवळ माठ, फुलझाडे विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्या माठांचा जेसीबीने चेंदामेदा केला. व्यापाऱ्यांनी बरीच गयावया केली; पण अधिकारी ठाम होते.
दुपारी ३ नंतर पथक गजानन महाराज मंदिरापासून पुढे सूतगिरणी चौकापर्यंत कारवाई करीत गेले. विभागीय क्रीडा संकुलापुढे मनपाचे युरोपियन मार्केट, चौपाटी इ. भागात सायंकाळी माेठी कारवाई केली. फळविक्रेत्यांसह विविध विक्रेत्यांनी लोखंडी पत्रे लावून शेड उभारले होते. कारवाईसाठी जेसीबी पुढे येताच व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला. अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी व्यापाऱ्यांची समजूत घातली. टपऱ्या जेसीबीने तोडण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी उर्वरित शेड स्वत: काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
आयुक्तांकडून पाहणी
मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दर्गा चौकात कारवाई सुरू असताना पाहणी केली. व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. आयुक्त म्हणाले, जागा तुमची असेल तर मालकी सिद्ध करा. त्यावर व्यवसाय सुरू करायचा असेल तर मनपाच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घ्यायला नको का? या प्रश्नावर व्यापारी निरुत्तर झाले.
आज पुन्हा कारवाई होणार
शहानूरमियाँ दर्गा चौक ते भाजीवाली बाई चौक आणि आनंद गाडे चौकापर्यंत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली.