शब्दात लय नसेल, तर गाणं अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:20+5:302021-02-05T04:12:20+5:30

औरंगाबाद : शब्दात लय नसेल, तर गाणं अशक्य आहे. एकदा लय ठरल्यावर संगीतकार तिला बदलू शकत नाही. लयीला विशिष्ट ...

If there is no rhythm in the words, the song is impossible | शब्दात लय नसेल, तर गाणं अशक्य

शब्दात लय नसेल, तर गाणं अशक्य

औरंगाबाद : शब्दात लय नसेल, तर गाणं अशक्य आहे. एकदा लय ठरल्यावर संगीतकार तिला बदलू शकत नाही. लयीला विशिष्ट तर्क असतो. चालीचा तर्क लागल्यावर ती स्वतःला आपोआप रचत जाते. लय ही गाण्याचे प्राणतत्त्व आहे, असे प्रतिपादन संगीतकार कौशल इनामदार यांनी काढले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मराठी भाषा व वाङ्मय विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमात ‘कवितेचं गाणं होताना’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले होते. विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य व समन्वयक डॉ.कैलास अंभुरे यांची यावेळी उपस्थिती होती.

कौशल इनामदार पुढे म्हणाले की, संगीतकार आधी कविता घेतो. मग तिला चाल लावतो. कवितेला चाल देताना, कवितेत सूचक शब्द असतात. त्यातून संगीतकार ध्‍वनिसूचक शब्द अधोरेखित करत असतो. छंदोबद्ध कवितेची जशी एक स्‍वत:ची लय असते, तशीच मुक्‍तछंदातील काही कवितांमध्‍येही लय असते. ती लय संगीतकाराला सापडली की, त्‍या कवितेचे गाणे होते. इनामदार यांनी यावेळी कवी कुसुमाग्रज, मर्ढेकर, ग्रेस व नारायण सुर्वे यांच्या कवितेचे गाणे कसे झाले, याचेही सांगीतिक सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.दासू वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन करून डॉ.कैलास अंभुरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य प्रा.राजेश करपे, प्रा.फुलचंद सलामपुरे, अधिसभा सदस्‍य प्रा.स्‍मीता अवचार, प्रा.मुंजा धोंडगे, प्रा.मुस्‍तजीब खान यांच्‍यासह प्राध्‍यापक, विद्यार्थी व रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचा दहा हजारांपेक्षा अधिक रसिकांनी आस्‍वाद घेतला.

चौकट....

इंग्रजीच्‍या दुराग्रहामुळे मराठीची दुरवस्था

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले की, संत साहित्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. अगदी प्रारंभापासूनच मराठी भाषेला अस्तित्‍वासाठी झगडावे लागलेले आहे, तरीही अनेक साहित्यिक, कवी, समीक्षक, रसिक व मराठीजनांनी तिचे तेज तेवत ठेवले आहे. दुर्दैवाने आपल्‍याकडील भाषिक ऐवज असणाऱ्या बोलींचा साहित्‍य व व्‍यवहारात पुरेपूर अवलंब झाला नाही. या भाषा खेडेपाडे, वाड्या, वस्‍त्‍या व पाड्यांवर टिकून राहिल्‍या. अलीकडे जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे व इंग्रजीच्‍या दुराग्रहामुळे मराठी भाषेची दुरवस्था निर्माण झाली आहे.

Web Title: If there is no rhythm in the words, the song is impossible