मोठा पाऊस झाला तर छत्रपती संभाजीनगरातील रस्त्यांवर तलाव, ड्रेन सिस्टीम बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:24 IST2025-07-28T19:24:13+5:302025-07-28T19:24:40+5:30

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अनेक ठिकाणी मनपाने व्यवस्थाच केलेली नाही.

If there is heavy rain, ponds and drain systems disappear on the roads of Chhatrapati Sambhaji Nagar. | मोठा पाऊस झाला तर छत्रपती संभाजीनगरातील रस्त्यांवर तलाव, ड्रेन सिस्टीम बेपत्ता

मोठा पाऊस झाला तर छत्रपती संभाजीनगरातील रस्त्यांवर तलाव, ड्रेन सिस्टीम बेपत्ता

छत्रपती संभाजीनगर : शनिवारी शहराला मुसळधार पावसाने दिवसभर झोडपले. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. जलवाहिन्या, गॅस जोडणी, ड्रेनेज आदींसाठी अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनधारक खड्ड्यात पडून जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

शनिवारी दिवसभरात ३१ मिमी पाऊस झाला. मुख्य रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था मनपाने केली नाही. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. दरवर्षी शहरातील कोणत्या मुख्य रस्त्यांवर पाणी थांबते, हे संबंधित वॉर्ड अभियंत्यांना माहीत आहे. पाण्याचा निचरा होईल, या दृष्टीने उपाययोजना करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविली आहे. पावसाळ्यापूर्वी प्रशासक जी. श्रीकांत यांच्याकडे सूचनाही आल्या होत्या. त्यानंतरही अनेक वॉर्ड अभियंत्यांनी दुर्लक्ष केले. जालना रोडवर खंडपीठाच्या समोरच पाणी साचते. त्यामुळे एका बाजूची वाहतूक मंदावते.

कुठे कुठे पाण्याचे तळे साचते ?
एन-३ खंडपीठाच्या पूर्वेकडील गेट, चेतक घोडा, मयूर पार्क मुख्य रस्ता, औरंगपुरा शहर बस थांबा, सिद्धार्थ उद्यानासमोरील नाल्यावर डावी बाजू, महावीर चौक, गजानन महाराज मंदिर रोड, स्वप्नननगरी, जयभवानीनगर चौक, एन-३ पारिजातनगर, औषधी भवन, उस्मानपुरा, आदी, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते.

पाण्याचा निचराच होत नाही
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अनेक ठिकाणी मनपाने व्यवस्थाच केलेली नाही. यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाला. त्यामुळे मनपाचे पितळ उघडे पडले. मुख्य रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत केले. पावसाचे पाणी कुठे जाईल, याचा विचारच मनपाने केलेला नाही.

काय म्हणतात तज्ज्ञ ?
साईड ड्रेन तयार करण्यासाठी पैसा खूप लागतो. हे करूनही काहीच उपयोग होत नाही. पाणी त्यात जात नाही. काहीजण त्यात कचरा टाकतात. त्याची सफाई मनपाकडून होत नाही. त्यामुळे रस्ता तयार करतानाच पाण्याला उतार दिला तर कुठेही पाणी साचत नाही, पुढे ते हळूहळू वाहून जाते. सिमेंट रस्त्यांवर चेंबर तरी तयार करावे.
- सी. एस. सोनी, निवृत्त शहर अभियंता, मनपा.

Web Title: If there is heavy rain, ponds and drain systems disappear on the roads of Chhatrapati Sambhaji Nagar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.