हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटमध्ये घोटाळा; बारावी पास कर्मचाऱ्याने कंपनीला लावला चुना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 20:19 IST2026-04-29T20:18:36+5:302026-04-29T20:19:04+5:30
कर्मचाऱ्याने परस्पर विक्री केल्या हजारो प्लेट; आरसी बुक मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर समोर आला प्रकार

हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटमध्ये घोटाळा; बारावी पास कर्मचाऱ्याने कंपनीला लावला चुना
छत्रपती संभाजीनगर : हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचे (एचएसआरपी) कंत्राट मिळालेल्या कंपनीच्याच कर्मचाऱ्याने हजारो प्लेट परस्पर विक्री करून घोटाळा केला आहे. प्राथमिक तपासात ८०० प्लेट त्याने विक्री केल्या असून, कंपनीच्या तपासात हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यातील ही प्लेट बसवलेल्या एकाही ग्राहकाला आरसी बुक भेटत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा धक्कादायक घोटाळा उघडकीस आला.
नीलेश बबन तुपे (रा. संतोषीमाता मंदिर, मुकुंदवाडी), असे आरोपीचे नाव असून, सिडको पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली. एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स या कंपनीकडे एचएसआरपी प्लेट तयार करण्याचे काम आहे. कंपनीचे अधिकारी सचिन चोपडे (३३, रा. पिसादेवी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाने त्यांच्याकडून नंबर प्लेट लावूनही अधिकृत आरसी बुक मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीचा धागा पकडून कंपनीने अंतर्गत चौकशी केली. त्यात सदर तक्रारदार ग्राहकाला प्लेट विक्री झाली होती. मात्र, अर्धवट माहिती अपडेट करून मुख्य सिस्टममध्ये त्याची नोंदणीच झाली नसल्याचे समोर आले. ही बाब उघड होताच नीलेश पसार झाला. मंगळवारी गुन्हा दाखल होताच अंमलदार भाऊसाहेब जगताप यांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
हजारो ग्राहकांच्या नोंदीवर प्रश्नचिन्ह
-कंपनीने गुन्हा दाखल करण्यासाठी केलेल्या प्राथमिक तपासात तुपेने एकट्याने अनेक नंबर प्लेट्सबाबत हा प्रकार केल्याचे समोर आले. त्याने सिस्टममध्ये कुठलीच नोंद न करता ८० हजारांच्या प्लेट्स परस्पर विकून पैसे लंपास केले.
-सेंटरमध्ये आलेल्या कोऱ्या एचएसआरपी नंबर प्लेटवर संबंधित वाहनाचा क्रमांक टाकून नोंदणी न करताच तो विकायचा. त्याने विकलेल्या नंबर प्लेट आरटीओ कार्यालयातील सिस्टममध्ये दिसत नसल्याने हजारो ग्राहकांच्या नोंदणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
-कंपनीने याप्रकरणी सखोल तपास सुरू केला असून याहून अधिक नंबर प्लेट्सचा घोटाळा झाल्याचा अंदाज तक्रारीत वर्तविला आहे.
अवघे बारावीपर्यंत शिक्षण
आरोपी नीलेश तुपेचे शिक्षण अवघे बारावीपर्यंत झालेले आहे. त्याचे आई-वडील उत्तरानगरीत राहतात, तर तो उस्मानपुऱ्यात स्वतंत्र राहतो. जानेवारीत घेाटाळा उघडकीस येत असल्याचे समजताच त्याने नोकरी सोडली होती.