पैशांअभावी उपचार न करता आल्याने मुलीचा मृत्यू; खचलेल्या बापाने काही तासांतच संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 11:42 AM2024-04-09T11:42:38+5:302024-04-09T11:43:35+5:30

सोयगाव नगर पंचायतीचे कर्मचारी दीपक प्रल्हाद राऊत यांना फेब्रुवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता.

Girl dies due to lack of money for medical treatment; The exhausted father ended his life within a few hours | पैशांअभावी उपचार न करता आल्याने मुलीचा मृत्यू; खचलेल्या बापाने काही तासांतच संपवले जीवन

पैशांअभावी उपचार न करता आल्याने मुलीचा मृत्यू; खचलेल्या बापाने काही तासांतच संपवले जीवन

सोयगाव (छत्रपती संभाजीनगर) : पैशांअभावी १९ वर्षांच्या मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाल्यावरून खचलेल्या नगर पंचायतीचा निलंबित कर्मचारी असलेल्या पित्याने घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. त्यानंतर वेतन न दिल्याने त्यांच्या मृत्यूस मुख्याधिकारीच जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाइकांनी मृतदेह नगर पंचायतीच्या प्रवेशद्वारावर आणून आंदोलन सुरू केले. महसूल व पोलिस प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दीपक प्रल्हाद राऊत (वय ४५ वर्षे) असे मृताचे नाव आहे.

सोयगाव नगर पंचायतीचे कर्मचारी दीपक प्रल्हाद राऊत यांना फेब्रुवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता. त्यातच त्यांची मुलगी वैष्णवी राऊत (वय १९ वर्षे) हिला पोटात त्रास होऊ लागला. त्यामुळे तिच्या उपचारासाठी निलंबन काळातील अर्धा पगार द्यावा, असा अर्ज २६ मार्च रोजी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याकडे दीपक राऊत यांनी दिला होता. तरीही त्यांना अर्धे वेतन मिळाले नाही. वैष्णवीच्या पोटदुखीचा त्रास वाढल्यामुळे तिला २ एप्रिल रोजी रात्री जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

३ एप्रिल रोजी वैष्णवीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती कोमात गेली. ७ एप्रिल रोजी पहाटे वैष्णवीचा मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्याजवळ पैसे नव्हते म्हणून आपली मुलगी गेली, या अपराधी भावनेतून दीपक राऊत हे अस्वस्थ झाले होते. याच अपराधी भावनेतून त्यांनी रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. त्यामुळे त्यांचे नातेवाईक व नागरिक हादरून गेले. संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी दीपक राऊत यांचा मृतदेह नगर पंचायतीच्या दारात आणून ठेवला. राऊत यांचे वेतन थांबवून त्यांना आर्थिक अडचणीत आणणाऱ्या मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर गुन्हा दाखल करावा व दीपकच्या पत्नीला शासकीय नोकरी द्या, या मागणीसाठी नातेवाइकांनी आक्रोश आंदोलन सुरू केले.

प्रशासनाची उडाली धांदल
याबाबत माहिती मिळताच प्रशासनाची धांदल उडाली. पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ते न ऐकण्याच्या मन:स्थितीत होते. शेवटी नायब तहसीलदार व्ही. टी. जाधव व सहायक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी तीन वाजता नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन्ही घटनांची सोयगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Girl dies due to lack of money for medical treatment; The exhausted father ended his life within a few hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.