फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून बोगीची होणार पुन्हा तपासणी

By Admin | Updated: December 15, 2014 00:51 IST2014-12-15T00:43:43+5:302014-12-15T00:51:04+5:30

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद-दौलताबाद रेल्वे स्थानकादरम्यान लागलेल्या आगीचे नेमके कारण घटनेच्या दीड महिन्यानंतरही स्पष्ट झालेले नाही.

Forensic experts will re-examine the bogey | फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून बोगीची होणार पुन्हा तपासणी

फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून बोगीची होणार पुन्हा तपासणी

औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरला औरंगाबाद-दौलताबाद रेल्वे स्थानकादरम्यान लागलेल्या आगीचे नेमके कारण घटनेच्या दीड महिन्यानंतरही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे रेल्वेकडून या प्रकरणाचा पहिल्यापासून तपास केला जाणार आहे. यासाठी रेल्वे बोगीची फॉरेन्सिकच्या पथकाकडूनही पुन्हा तपासणी करण्याचा विचार केला जात आहे.
या पॅसेंजरला २५ आॅक्टोबर रोजी रात्री आग लागून एक अख्खी बोगी जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी विविध शक्यतांची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. शिवाय घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी जळालेल्या बोगीची फॉरेन्सिकच्या पथकाकडून तपासणी केली. यासाठी फॉरेन्सिक पथकाकडून जळालेल्या बोगीतून विविध नमुने गोळा करण्यात आले.
शॉर्टसर्किट, ब्रेक लायनरमधील तांत्रिक दोष या बाबी घटनेला कारणीभूत नसून फॉरेन्सिकच्या अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले; परंतु तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये कोणताही ज्वलनशील पदार्थ नसल्याचा अहवाल फॉरेन्सिककडून मिळाला. त्यामुळे आगीच्या कारणाचे गूढ आणखी वाढले. घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली चार अधिकाऱ्यांची समिती अद्यापही अंतिम निर्णयापर्यंत आली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या घटनेची सुरुवातीपासून चौकशी करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर येत असल्याचे दिसत आहे. या ‘द बर्निंग ट्रेन’चे रहस्य दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत असून ते कधी उलगडणार हा प्रश्न आहे.

Web Title: Forensic experts will re-examine the bogey