त्या एजंटला पाच दिवसांची कोठडी

By Admin | Updated: August 10, 2014 02:03 IST2014-08-10T01:50:04+5:302014-08-10T02:03:40+5:30

औरंगाबाद : सुपर पॉवर कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणारा एजंट हरिहर बन्सीधर साबळे यास पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बीड बायपास परिसरात अटक केली

Five-day agent for that agent | त्या एजंटला पाच दिवसांची कोठडी

त्या एजंटला पाच दिवसांची कोठडी

औरंगाबाद : सुपर पॉवर कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणारा एजंट हरिहर बन्सीधर साबळे यास पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बीड बायपास परिसरात अटक केली. त्यास शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.
सुपर पॉवर कंपनीने अल्पावधीत गुंतवणुकीच्या अडीच ते तीनपट परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यात आणि राज्याबाहेरील गुंतवणूकदारांकडून मोठ्या रकमा जमा केल्या होत्या. मात्र, करारानुसार कंपनीने गुंतवणूकदारांना परतावा दिला नाही, उलट ठिकठिकाणचे कार्यालये बंद केल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले होते.
याप्रकरणी आरोपीविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुण्यातील मगरपट्टा येथे राहणाऱ्या दीपक आणि दिव्या पारखे पती-पत्नी संचालकांना अटक केली. त्यांना अटक झाल्याची बातमी समोर येताच शेकडो तक्रारदार पुढे आले. यात राज्याबाहेरीलही गुंतवणूकदारांचा समावेश आहे. तसेच अजूनही तक्रारी येतच
आहे.
दरम्यान, परतूर तालुक्यातील सातोना येथील रहिवासी हरिहर साबळे या एजंटाने तालुक्यातील अनेकांना सुपर पॉवर कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे समोर आहे. फसव्या कंपनीत नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी तो सतत गुंतवणूकदारांच्या घरी जात, त्यांना विविध प्लॅन तो समजावून सांगत असे. त्याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी सुपर पॉवर कंपनीत मोठ्या रकमा गुंतविल्या होत्या. पारखे दाम्पत्याला अटक झाल्यापासून तो मात्र, फरार झाला होता.
अटकेनंतर शनिवारी दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले.
याप्रसंगी पोलिसांतर्फे युक्तिवाद करण्यात आला की, आरोपीने जमा केलेल्या रकमेतून स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे का, याचा शोध घ्यावयाचा आहे. तसेच त्याच्या बँक खात्यात किती रक्कम आहे, याबाबतची माहिती घेऊन बँक खाती सील करावयाची आहे. तसेच त्याच्यासोबत आणखी किती साथीदार आहेत, याबाबतची माहिती घेण्यासाठी ७ दिवस पोलीस कोठडी मागितली. यावेळी न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

Web Title: Five-day agent for that agent