पहिला डोस १५ फेब्रुवारीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:56+5:302021-02-05T04:22:56+5:30

दुसरा डोस २८ दिवसांनी : जिल्ह्यात आजपासून १८ केंद्रांवर लसीकरण औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर चार ...

The first dose is until February 15 | पहिला डोस १५ फेब्रुवारीपर्यंत

पहिला डोस १५ फेब्रुवारीपर्यंत

दुसरा डोस २८ दिवसांनी : जिल्ह्यात आजपासून १८ केंद्रांवर लसीकरण

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर चार आठवड्यांनी म्हणजे २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.

देशात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी ३३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. यासाठी औरंगाबादला ३३ हजार डोस मिळाले आहेत. दोन डोसनुसार १५ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना हे डोस पुरणार आहेत. परंतु सोमवारी आणखी काही प्रमाणात लसींचा पुरवठा होणार आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण सुरुवातीच्या एक दिवसानंतर अचानक कमी झाले. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी प्रमाण वाढले. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना २८ दिवसांनी दुसरा डोस द्यावा लागणार आहे. त्यामुळे आगामी २० दिवसांत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देऊन पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. शहरात घाटीसह मनपाची ११ केंद्र आणि ग्रामीण भागांत ७ केंद्रांवर सोमवारपासून लसीकरण केले जाईल.

ग्रामीण भागांत केंद्र वाढणार

ग्रामीण भागात आता कन्नड, खुलताबाद ग्रामीण रुग्णालय आणि गंगापूर उपजिल्हा रुग्णालय या तीन ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांची होत असलेली गैरसोय थांबणार आहे.

Web Title: The first dose is until February 15