खते, बियाणे पडून

By Admin | Updated: August 13, 2015 00:26 IST2015-08-12T23:59:28+5:302015-08-13T00:26:31+5:30

राजेश खराडे ,बीड पावसाच्या लहरीपणाचा फटका केवळ शेतकरी वर्गालाच नाही तर खत, बि-बीयाणे विक्रेत्यांनाही बसला आहे. यंदा मागणीएवढा बी-बियाणांचा पुरवठा झाला होता.

Fertilizers, the seeds fall | खते, बियाणे पडून

खते, बियाणे पडून


राजेश खराडे ,बीड
पावसाच्या लहरीपणाचा फटका केवळ शेतकरी वर्गालाच नाही तर खत, बि-बीयाणे विक्रेत्यांनाही बसला आहे. यंदा मागणीएवढा बी-बियाणांचा पुरवठा झाला होता. पावसाअभावी पेरण्या निम्म्यावरच ठप्प झाल्याने सुमारे ७२६३ क्विंटल बियाणे गोदामातच पडून आहे. पावसाने ओढ दिल्याने दुबारचीही आशा संपुष्टात आली आहे. त्यामुळे विके्रत्यांना लाखोंचा फटका बसला आहे.
यंदा पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या मुख्य पिकांच्या पेऱ्यावर भर दिला होता. त्यामुळे कापसाच्या पाकिटांची सर्रास विक्री झाली होती. मात्र, सोयाबीनच्या घरच्या बियाणावरच भर दिल्याने विक्रत्यांकडे सुमारे ५२१७ क्विंटल बियाणे शिल्लक राहिले आहे. प्रशासनाकडून महाबीजचे २२ हजार ५८९ चे बियाणे पुरविण्यात आले असल्याचे जि. प. चे कृषी विकास अधिकारी डी. बी. बिटके यांनी सांगितले.
खाजगी तत्वावर २२ हजार ४८५ क्विंटलच्या बियाणांची पूर्तता करण्यात आली होती. वाढती मागणी पाहता कृषि विभागाने व व्यापाऱ्यांनी अधिकच्या बियाणांची खरेदी केली होती. मात्र, १५ जुलैपासून पावसाने ओढ दिल्याने बाजारपेठेतील शेतकऱ्यांची गर्दी ओसरली. परिणामी पेरणीत घट होत गेली. जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र येथेही पावसाने दगाबाजी केल्याने दुबार पेरण्या तर सोडाच, आहे त्या पिकांची मोडणी करण्याचे संकट ओढावले होते. शहरातील प्रमुख बी-बियाणे वितरकांनी उधारीवर बी-बियाणे विक्रीसाठी दिले होते.
सध्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीच बिकट असल्याने खरेदी झालेल्या बियाणांची वसुली होत नाही. शिवाय निम्म्यापेक्षा अधिकचे बियाणे गोदामात पडून असल्याने व्यापारीही शेतकऱ्यांप्रमाणे दुहेरी संकटात सापडलेले आहेत. शिल्लक बियाणांचा स्टॉक संबंधित कंपनीकडे पाठविण्यात येत असला तरी त्याचे पैसे रोख स्वरुपात मिळत नसून पुढील वर्षाच्या बियाणांसाठी पैसे राखून ठेवले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारपेठेतील पत टिकवून ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना जवळचा पैसा तर गुंतवून ठेवावा लागत आहे, शिवाय बॅकांकडून घेतलेल्या रकमेवरचे व्याज भरणा देखील करावा लागत आहे. खरिपातील खोळंबलेल्या पेरणीचा फटका शेतकऱ्यांसोबतच बियाणे विक्रेत्यांनाही अप्रत्यक्षरित्या बसला आहे. खरीप ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, सोयबीन आदींचे बियाणे तर कापसाचे पाकीटे मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत.
जिल्ह्यातील लहान-मोठ्या विक्रेत्यांना उधारीवर खत, बि-बीयाणे देण्यात आले हाते. हंगामाच्या सुरवातीला बाजारपेठेत शेतकऱ्यांचा मोठा उत्साह होता. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांकडे विक्रेत्याचे व विक्रेत्यांकडे आमचे पैसे आडकले आहेत. शिल्लक बियाणे कंपनीकडे पाठवूनही त्वरीत पैसे मिळण्याची आशा धुसर आहे.
- जगदीश मंत्री, विक्रेते
कापूस पाकिटांची बऱ्यापैकी विक्री झाली आहे. मात्र, यंदा शेतकऱ्यांनी घरच्या सोयाबीन बियाणावर भर दिल्याने ते अधिक प्रमाणात शिल्लक आहे. खतेही पडून आहेत. वेळोवेळी संबंधित कंपनीशी बियाणे व खते परतविण्यासाठी संपर्क सुरू आहे. अद्यापपर्यंच्या व्यवसायिकतेमध्ये सर्वाधिक फटका यंदाच्या हंगामात बसला आहे.
- शीतल बागमार, विक्रेते

Web Title: Fertilizers, the seeds fall