टोमॅटोमुळे शेतकऱ्यांचे केचप

By Admin | Updated: November 30, 2014 00:59 IST2014-11-30T00:14:20+5:302014-11-30T00:59:27+5:30

औरंगाबाद : पिकते तेथे विकत नाही, अशी म्हण आहे. सध्या ही म्हण टोमॅटोला तंतोतंत लागू होत आहे.

Farmers' ketchup due to tomato | टोमॅटोमुळे शेतकऱ्यांचे केचप

टोमॅटोमुळे शेतकऱ्यांचे केचप

औरंगाबाद : पिकते तेथे विकत नाही, अशी म्हण आहे. सध्या ही म्हण टोमॅटोला तंतोतंत लागू होत आहे. एकीकडे भाव इतके घसरले की किलोमागे २ ते ३ रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत, वाहतूक खर्चही निघत नसल्याने हताश झालेला बळीराजा रस्त्यावरच टोमॅटो फेकून देत आहे. दुसरीकडे हेच टोमॅटो शहरातील भाजीमंडईत व्यापारी १५ ते २० रुपये किलोपर्यंत विक्री करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हातातील मालास मातीमोल भाव आणि तोच माल व्यापाऱ्यांच्या हातात आला तर त्यांची चांदी होते. हा विरोधाभास टोमॅटोच्या व्यवहारात दिसून येत आहे.
जाधववाडी बाजारपेठेत शनिवारी ४२५ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. श्रीरामपूर, सोलापूर, लातूर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आदी भागांतून टोमॅटो विक्रीला येत आहे. ४०० ते ६५० रुपये प्रतिक्विंटल टोमॅटो विक्री झाल्याची आकडेवारी बाजार समितीने दिली. औरंगपुरा भाजीमंडईत आज १५ ते २० रुपये किलोने हा टोमॅटो विक्री झाला. श्रीरामपूरहून औरंगाबादेतील अडत बाजारात आणलेला टोमॅटो ४ ते ६.५० रुपये प्रतिकिलो दर मिळतो आणि जाधववाडीतून शहरातील भाजीमंडईत तो टोमॅटो येतो त्यास १५ ते २० रुपये दर मिळतो. दुष्काळाने आधीच होरपळलेल्या शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. सागर पुंड या विक्रेत्याने सांगितले की, जाधववाडीत ४ ते ७ रुपयांपर्यंत आम्हाला टोमॅटो विकत मिळतो, मंडईपर्यंत आणण्यासाठी लोडिंग रिक्षाचे भाडे लागते, नफा मिळून त्याची रक्कम दुप्पट होते. शेतकऱ्यांना टोमॅटोचा मातीमोल भाव, तर ग्राहकांना अधिक पैसे मोजून टोमॅटो घ्यावे लागत आहेत.

Web Title: Farmers' ketchup due to tomato