चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना दिल्या सुविधा

By Admin | Updated: June 17, 2014 00:38 IST2014-06-17T00:21:51+5:302014-06-17T00:38:48+5:30

परभणी: जिल्हा पोलिस दलात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी घेतली जात असून, प्रशासनाच्या वतीने उमेदवारांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात आहेत.

Facility to the candidates who have been given for the test | चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना दिल्या सुविधा

चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना दिल्या सुविधा

परभणी: जिल्हा पोलिस दलात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी घेतली जात असून, प्रशासनाच्या वतीने उमेदवारांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात आहेत.
१४४ पदांसाठी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कागदपत्र तपासणी पूर्ण झाली असून, १५ जूनपासून प्रत्यक्ष मैदानी चाचणीला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी ४०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले होते. त्यापैकी ३७६ उमेदवार उपस्थित झाले.या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सकाळी ६ ते ८ या वेळेत उमेदवारांची पाच कि. मी. अंतराची धावण्याची चाचणी घेतली जात आहे. तसेच दुपारच्या सत्रात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर लांब उडी, गोळा फेक, पूल अप्स आणि १०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जात आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी पोलिस प्रशासनाने योग्य त्या सोयी सुविधा पुरविल्या आहेत. वैद्यकीय व्यवस्थेबरोबरच दूध व केळी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मैदान शारीरिक चाचणी घेण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराला तो या चाचणीसाठी तयार आहे काय? त्याला काही आजार आहे काय, याची विचारणा करण्यात येत आहे. भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून उमेदवार येथे दाखल झाल्यामुळे त्यांच्या जेवणाची व निवासाची व्यवस्था पोलिस प्रशासनाने केली असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)
उमेदवारांना आवाहन
पोलिसात भरती करुन देतो, माझी अधिकाऱ्यांशी ओळख आहे, गुण वाढवून देतो, भरतीमध्ये तुला अडचण येऊ देत नाही, अशा अमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील आणि अप्पर पोल्सि अधीक्षक नियती ठाकर यांनी केले आहे.
व्हिडीओ चित्रीकरण
भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक क्षणाचे व्हीडीओ चित्रीकरण करुन घेतले जात आहे. उमेदवारास त्याच्या अपात्रतेबाबत लेखी पत्रक देऊन तो अपात्र का झाला, याबाबत स्पष्ट उल्लेख या पत्रात केला जात आहे.
भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना लायन्स क्लब परभणी प्रभावती, संजीवनी मित्र मंडळ, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन या सारख्या संस्थांनी देखील अल्पोहाराची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे मैदानी चाचणी पूर्ण होईपर्यंत अल्पोहार दिला जाणार आहे. तसेच पोलिस प्रशासनाने देखील सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

Web Title: Facility to the candidates who have been given for the test