‘ईद- उल- अज्हा’ उत्साहात
By Admin | Updated: October 7, 2014 00:44 IST2014-10-07T00:30:44+5:302014-10-07T00:44:14+5:30
औरंगाबाद : त्यागाचे प्रतीक असलेली ‘ईद- उल- अज्हा’ आज पारंपरिक पद्धतीने भक्तिभावात साजरी करण्यात आली.

‘ईद- उल- अज्हा’ उत्साहात
औरंगाबाद : त्यागाचे प्रतीक असलेली ‘ईद- उल- अज्हा’ आज पारंपरिक पद्धतीने भक्तिभावात साजरी करण्यात आली. छावणीतील मुख्य ईदगाह तसेच ईदगाह उस्मानपुरा, ईदगाह रोजाबाग, ईदगाह शाह शोख्तामियाँ आणि विविध मशिदींमध्ये ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
छावणी येथील मुख्य ईदगाहमध्ये सकाळी ९.१५ वाजता विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी, प्रसिद्ध विचारवंत डॉ. जावेद मुकर्रम यांनी इस्लाम धर्माची शिकवण काय आहे. माणुसकी हाच केंद्रबिंदू मानण्यात आला. देशाची एकता आणि अखंडता कशी कायम राहील, धर्माच्या शिकवणीनुसार बंधुत्वाला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
जियाऊद्दीन सिद्दीकी यांनी काही ठरावांचे वाचन केले. उपस्थित जनसमुदायाने त्याला संमती दिली. जामा मशीदचे मौलाना मोईजोद्दीन फारुकी नदवी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना नमूद केले की, समर्पण आणि त्यागाचे प्रतीक म्हणून ‘ईद- उल- अज्हा’ आहे. हजरत इब्राहीम यांनी आपल्या सर्वांत प्रिय ज्येष्ठ पुत्र हजरत इस्माईल याची कुर्बानी देण्याची तयारी दर्शवून जगापुढे ‘समर्पण आणि त्यागा’चे अनोखे उदाहरण सादर केले. त्यागाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी यासाठी इस्लाम धर्मात बकरी ईद सणाला विशेष महत्त्व आहे. एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत वा गरीब असली तरी तिला आपल्याजवळील काही ना काही वस्तूंचा त्याग करावाच लागतो, असेही त्यांनी नमूद केले.
मौलाना नसीमोद्दीन मुफ्ताई यांनी पवित्र हज यात्रेचे महत्त्व विशद केले. इस्लाम धर्मात कोणकोणत्या बाबी अत्यावश्यक करण्यात आल्या आहेत. यामागचे कारण काय आदी बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. यानंतर जामा मशीदचे इमाम मौलाना हाफेज जाकेर यांनी ईदची मुख्य नमाज पढविली. तसेच ‘खुदबा’चे वाचनही केले. यानंतर विशेष दुआ करण्यात आली.
छावणी ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टीने वाहतून पोलीसही तैनात केले होते. महापालिकेतर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ईदगाह कमिटीतर्फे साफसफाई करण्यात आली आणि भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली.
मैदानाच्या बाहेर शुभेच्छा देण्यासाठी मंडप उभारण्यात आला होता. यावेळी पोलीस आयुक्त राजेंद ्रसिंह, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, रशीद मामू, जेम्स अंबिलढगे, अॅड. सय्यद अक्रम, नगरसेवक शहनवाज खान, मिलिंद दाभाडे, इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी, संजय जगताप आदींची उपस्थिती होती.