प्रलंयकारी भूकंपाला २१ वर्ष

By Admin | Updated: September 30, 2014 01:26 IST2014-09-30T00:14:58+5:302014-09-30T01:26:08+5:30

उस्मानाबाद : विघ्नहर्त्या श्री गणेशाला मोठ्या थाटामाटात निरोप देवून निदे्रच्या आधीन झालेल्या अनेकांसाठी पुढे आलेली सकाळ आपल्या कवेत विनाश घेवूनच आली होती.

The earthquake is a 21 year earthquake | प्रलंयकारी भूकंपाला २१ वर्ष

प्रलंयकारी भूकंपाला २१ वर्ष


उस्मानाबाद : विघ्नहर्त्या श्री गणेशाला मोठ्या थाटामाटात निरोप देवून निदे्रच्या आधीन झालेल्या अनेकांसाठी पुढे आलेली सकाळ आपल्या कवेत विनाश घेवूनच आली होती. ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे ३.५५ वाजता सास्तूर, किल्लारीसह उस्मानाबाद, लातूर जिल्हा भूकंपाने हादरला.
त्यापूर्वीही काही दिवस अगोदरपासून भूकंपाचे धक्के सुरुच होते. मात्र पहाटेच्या ६.५ रिस्टर स्केलच्या या धक्क्याने गावेच्यागावे बेचिराख केली. काय होतयं हे समजण्याअगोदरच सुमारे १० हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. १६००० पेक्षा अधिक ग्रामस्थ जखमी झाले. भूकंपाने या दोन जिल्ह्यातील ५२ गावे आणि त्यातील ५३ हजार घरे उद्ध्वस्त केली. मंगळवारी या घटनेला २१ वर्ष पूर्ण होत आहेत. २१ वर्षानंतर या परिसराचे चित्र झपाट्याने बदलल्याचे दिसत आहे. मागील काही वर्ष भूकंपात कोसळलेल्या घरांचे, गावांचे अवशेष जागोजागी दिसत होते. दुसरीकडे पुनर्वसीत घरे उभारण्याची लगबग पहायला मिळत असे. या वस्त्यात नव्याने बांधलेली घरे पाहिली असता, जाती अहंकाराच्या उतरंडी शाबूत असल्याचे जाणवले. २१ वर्षानंतर बहुतांश ठिकाणचे दगड मातीचे जुने अवशेष कायमचे नष्ट झाल्याचे व त्याच्याच शेजारी शासन विविध संस्था, संघटनांनी बांधून दिलेल्या सिमेंटच्या नियोजनबध्द वस्त्या उभारलेल्या आहेत. मात्र रोजच्या जगण्याच्या... रोजी-रोटीच्या प्रश्नांचा पिंगाही सुरुच आहे. भूकंपग्रस्त म्हणून असलेली ओळख काळाच्या ओघात अशी पुसली जात असतानाच नवी पिढीही या विनाशकारी घटनेबद्दल अनभिज्ञ दिसली. मात्र या भूकंपाच्या झळा ज्यांनी अंगाखांद्यावर झेलल्या...सोसल्या...भोगल्या, आपल्या आप्तेष्टांना डोळ्यासमोरुन हिरावून जाताना पाहिले त्यांच्या जखमा मात्र २१ वर्षानंतरही ओल्याच असल्याचे दिसून आले. त्यामुळेच भुकंपाची ती भयान काळरात्र आठवते. अन् मग आपोआपच त्यांच्या डोळ्यांच्या कडा अश्रुंनी चिंब होवून जातात. भूकंपग्रस्त गावात असे अनेक उंबरठे आहेत. जिथे नावालाही माणूस राहिलेला नाही. तर काही ठिकाणी घरात एखादाच माणूस राहिल्याचे दिसते. संपूर्ण कुटुंबावर एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर परमेश्वराने मला तरी का ठेवले? या त्यांच्या काळीज चिरणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाकडेच नसते. भूकंपात गेलेल्यांच्या स्मृतींना मंगळवारी पुन्हा उजाळा मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The earthquake is a 21 year earthquake