प्रकल्पांचा निधी इतरत्र वळविल्याने दुष्काळ

By Admin | Updated: August 18, 2015 00:54 IST2015-08-18T00:27:39+5:302015-08-18T00:54:05+5:30

लातूर / निटूर : तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले होते़ त्यानुसार त्यांनी मराठवाड्यात लहान-मोठे ३०० प्रकल्प (धरणे) बांधण्याचा निर्णय घेतला होता़

Due to diversion of funds from other projects, drought | प्रकल्पांचा निधी इतरत्र वळविल्याने दुष्काळ

प्रकल्पांचा निधी इतरत्र वळविल्याने दुष्काळ


लातूर / निटूर : तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले होते़ त्यानुसार त्यांनी मराठवाड्यात लहान-मोठे ३०० प्रकल्प (धरणे) बांधण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु, प्रकल्पांचा निधी इतरत्र वळविल्याने धरणे बांधली गेली नाहीत़ त्यामुळे मराठवाड्यात सध्या दुष्काळ पडला आहे़ काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच याला जबाबदार आहे़ त्यांनी जलयुक्त शिवार सारखा एखादा उपक्रम राबविला असता तर मराठवाड्यात दुष्काळ बघण्याची वेळ आली नसती, असा आरोप पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी लातूर जिल्ह्यातील पाहणी दौऱ्यात केला.
पाणीपुरवठा मंत्री लोणीकर रविवारपासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत़ रविवारी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाची पाहणी मुरुड, अकोला, चिंचोलीराव वाडी, वासनगाव, गंगापूर, खंडापूर येथील कामांची पाहणी केली़ त्यानंतर सोमवारी निलंगा तालुक्यातील गौर, आनंदवाडी, तुपडी, दगडवाडी, पानचिंचोली आदी गावांतील पीक परिस्थितीची पाहणीही केली़ यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते़ लोणीकर म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने सिंचनाचा एकही प्रकल्प राबविला नाही़ त्यामुळे सध्या मराठवाड्यात दुष्काळ आहे़ या दुष्काळाबाबत शासन गंभीर असून, शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी कर्नाटक व मध्य प्रदेशातून चारा मागवू, पाणीटंचाईच्या उपाययोजना शासनाने सुरु केल्या आहेत़ तातडीच्या योजना राबविण्यात येत आहेत़
शासन शेतकऱ्यांसाठी काहीही करण्यास तयार आहे़ त्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती पाहण्यासाठी मंत्र्यांचे दौरे आहेत़ लातूर जिल्ह्यातील परिस्थिती बिकट असून, त्यावर मात करण्यासाठी शासनाने उपाययोजना सुरु केले असल्याचेही पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले़ (प्रतिनिधी)
राज्य शासन दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपक्रम राबवीत आहे़ रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत़ गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी आपल्या गावात कोणत्या प्रकारची कामे होऊ शकतात किंवा कोणती कामे शिल्लक आहेत़ या कामांची मागणी त्वरित वरिष्ठांकडे करावी, नसता कर्मचाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, असेही पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले़ पाहणी दौऱ्यात खा़डॉ़ सुनील गायकवाड, आ़ सुधाकर भालेराव, माजी खा़रुपाताई पाटील निलंगेकर, माजी आ़पाशा पटेल, गोविंद केंद्रे, नागनाथ निडवदे आदींचा समावेश होता़

Web Title: Due to diversion of funds from other projects, drought