नेहमीप्रमाणे शिवाजीनगरच्या भुयारी मार्गात ट्रक अडकला; प्रखर उन्हात वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:10 IST2026-05-11T16:06:42+5:302026-05-11T16:10:08+5:30
ट्रक निघाल्यावरसुद्धा परिसरामध्ये तब्बल एक तासापेक्षा जास्त काळ वाहतूक विस्कळीत होती.

नेहमीप्रमाणे शिवाजीनगरच्या भुयारी मार्गात ट्रक अडकला; प्रखर उन्हात वाहनांच्या रांगा
सातारा/देवळाई : भुयारी मार्गातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, जड वाहने अडकण्याच्या प्रकारांमुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गातून प्रवास करणे जिकिरीचे होत आहे.
रविवार, दि. १० रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भुयारी मार्गातून देवळाई चौकाकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच २२ एए ३४४१) देवळाई येथील लोखंडी चौकटीत अडकला. बराच वेळ प्रयत्न करून ट्रक चौकटीतून निघत नसल्याने शेवटी ट्रक माघारी घेऊन काढण्यात आला. परिणामी, कडक उन्हात वाहनांच्या रांगा थेट शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीपर्यंत एका बाजूने लागल्या, तसेच देवळाई चौकातही वाहतूक ठप्प होती. ट्रक निघाल्यावरसुद्धा परिसरामध्ये तब्बल एक तासापेक्षा जास्त काळ वाहतूक विस्कळीत होती.
संध्याकाळी ७ वाजता स्कूल बस बिघडल्याने कोंडी...
रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथून देवळाईकडे जाणारी एक स्कूल बस (क्र. एमएच २० जीसी १९६६ ) भर रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे चारचाकी वाहनांसाठी शिवाजीनगर ते देवळाई मार्ग वाहतूक पोलिसांकडून तात्पुरता बंद करण्यात आला. तासभर होऊनसुद्धा बंद पडलेली बस निघाली नाही. यामुळे, चारचाकी वाहनांना पर्यायी धरतीधन सोसायटी याअंतर्गत मार्गाचा तर अनेकांनी शहानूरमिया दर्गामार्गे संग्रामनगर उड्डाणपूल हा पर्यायी मार्ग निवडला.
दिवसातून एकदा तरी वाहन अडकून वाहतूक ठप्प
रविवार, सुटीचा दिवस असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. त्यामुळे,संध्याकाळी वाहतूक कोंडीत नागरिक, विद्यार्थी आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात अडकून पडले. शिवाजीनगर भुयारी मार्गात दिवसातून एकदा तरी जड वाहन अडकून वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळते, तसेच संध्याकाळी गर्दीच्या वेळेत वाहने एकमेकांसमोर आल्याने भुयारी मार्गात वाहनांच्या रांगा लागतात.