मस्तीत नाही, शिस्तीत राहा, नियम मोडाल तर याद राखा; पोलिस उपायुक्तांची रिक्षाचालकांना तंबी

By सुमित डोळे | Published: December 22, 2023 02:10 PM2023-12-22T14:10:40+5:302023-12-22T14:11:30+5:30

बेशिस्त रिक्षाचालकांमुळे शहरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे

Don't be in fun, stay disciplined, remember if you break the rules; Deputy Commissioner of Police Shilwant Nandedkar's message to the rickshaw drivers | मस्तीत नाही, शिस्तीत राहा, नियम मोडाल तर याद राखा; पोलिस उपायुक्तांची रिक्षाचालकांना तंबी

मस्तीत नाही, शिस्तीत राहा, नियम मोडाल तर याद राखा; पोलिस उपायुक्तांची रिक्षाचालकांना तंबी

छत्रपती संभाजीनगर : मार्किंग नाही म्हणून चौकांमध्ये कशाही रिक्षा उभ्या करायच्या, गणवेश घालायचा नाही, गाणे वाजवत सुसाट रिक्षा पळवायची, वाटेल तसे दर आकारायचे, हे नित्याचे झाले आहे. गुन्हेगारांचे प्रमाण वाढते असूनही तुम्ही आम्हाला कळवत नाही. आता ते चालणार नाही. सर्वांनी शिस्तीत राहायचे, नियम मोडाल तर कठोर कारवाई करणार, अशी तंबीच पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी रिक्षाचालकांना दिली.

गेल्या काही महिन्यांत शहर वाहतूक विस्कटली आहे. ठिकठिकाणी वाहतूक खोळंबणे, मोठ्या कार्यक्रमांमध्ये नियोजनाचा अभाव, अवैध पार्किंग, अवैध प्रवासी वाहतुकीने डोके वर काढले. त्यातच बेशिस्त रिक्षाचालकांमुळे शहरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या सर्व बाबी लक्षात घेत पोलिस मुख्यालय व वाहतूक विभागाचे उपायुक्त नांदेडकर यांनी बुधवारी आयुक्तालयात रिक्षाचालक मालक व संघटनांची बैठक बोलावली होती. सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात, निरीक्षक अमोल देवकर, सहायक निरीक्षक सचिन मिरधे यांची यावेळी उपस्थिती होती.

रिक्षामालकांच्याही समस्या
रिक्षाचालक, मालकांनीदेखील यावेळी समस्या मांडल्या. शहरात कोठेही मार्किंग, अधिकृ़त थांबे नसल्याने रिक्षा उभी करण्यात अडचणी येतात. जिल्हाधिकारी कार्यालयात नियमित ट्रान्सपोर्ट बैठक होत नाही. किमान थांबे नियोजित करून दिल्यास समस्या सुटतील, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली.

सूचनांचे पालन करावेच लागेल
उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त थोरात यांनी रिक्षाचालकांना तंबी देताना सूचना केल्या. याचे पालन न झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला. तुम्हाला केवळ दंडाविषयीच माहिती असेल. परंतु त्याही पुढे कठोर कायदे आहेत. त्याचा वापर करण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असा इशारा दोघांनी यावेळी दिला. आज, गुरुवारपासून यासाठी तपास मोहीमच हाती घेतली जाणार आहे.

काय आहेत नियम :
- रिक्षाचालकांनी गणवेश परिधान करावा.
- चालकाजवळ प्रवाशांना बसवू नये.
- चौकांमध्ये बेशिस्तपणे रिक्षा उभी राहणार नाही. एका रांगेत उभे राहावे.
- रिक्षात गाणे वाजवू नये, वेग मर्यादित ठेवावा.
- नियमाने दर आकारावे.
- महिला, तरुणींसोबत योग्य वागणूक ठेवावी.

Web Title: Don't be in fun, stay disciplined, remember if you break the rules; Deputy Commissioner of Police Shilwant Nandedkar's message to the rickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.