अंगणात झोपलेल्या महिलेवर काळाचा घाला; गाढ झोपेत असताना ट्रॅक्टरने चिरडल्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 14:31 IST2022-05-19T14:30:03+5:302022-05-19T14:31:05+5:30
भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याने अंगणात महिला बेशुद्धावस्थेत पडली होती.

अंगणात झोपलेल्या महिलेवर काळाचा घाला; गाढ झोपेत असताना ट्रॅक्टरने चिरडल्याने मृत्यू
सिल्लोड (औरंगाबाद): उकाडा सहन होत नसल्याने खातखेडा येथे रात्री घरासमोर अंगणात झोपलेल्या एका ४५ वर्षीय महिलेचा ट्रॅक्टरने चिरडल्याने गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला. लिलाबाई कचरू पहारे (रा.खातखेडा ता.सिल्लोड) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, लीलाबाई पहारे या बुधवारी रात्री आपल्या आईवडिलांच्या घरासमोर अंगणात झोपल्या होत्या. रात्री १२:३० वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रॅक्टरने त्यांना चिरडले. मोठा आवाज आल्याने नातेवाईक घराबाहेर आले. अंगणात बेशुद्धावस्थेत पडलेल्या लीलाबाई यांना नातेवाईकांनी प्रथम सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे आज पहाटे ६ वाजेच्या दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेत आहेत.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.