महिला विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउट्स लढतीत वाइल्ड कार्ड एन्ट्री मारणाऱ्या शफाली वर्मानं बॅटिंगमध्ये विक्रमी खेळी केल्यावर चेंडू हातात मिळताच गोलंदाजीतील जादू दाखवून दिली. २१ व्या षटकात हरमनप्रीत कौरनं शफालीच्या हाती चेंडू सोपवला अन् तिने आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सुने लूसच्या रुपात पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली. एवढ्यावरच ती थांबली नाही. दुसऱ्या षटकात तिने मेरिझॅन कॅपच्या रुपात आणखी एक विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले.
आधी बॅटिंगमध्ये विक्रमी कामगिरी
शफाली वर्मा ही महिला विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातील राखीव खेळाडूंमध्येही नव्हती. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताची सलामीची बॅटर प्रतीका रावल दुखापतग्रस्त झाली अन् ती स्पर्धेतून बाहेर पडली. तिची जागा भरून काढण्यासाठी शफाली वर्माला थेट उपांत्य सामन्यात संघात स्थान मिळाले. वर्षभरानंतर कमबॅक करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी खेळी करण्यात ती अपयशी ठरली. पण अंतिम सामन्यात तिने विक्रमी खेळी करत महिला विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
चेंडू हाती सोपवताच दाखवली गोलंदाजीतील जादू
शफाली वर्माही स्फोटक फलंदाजीशिवाय पार्ट टाइम गोलंदाजी करते. हरमनप्रीत कौरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिच्यावर डाव खेळला अन् तिने चेंडू हातात येताच जादूही दाखवून दिली. सुने लूस हिला तिने २५ धावांवर स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला तिसरा धक्का दिला. तिची जागा घेण्यासाठी आलेल्या ऑलराउंडर मेरिझॅन कॅपला शफालीनं विकेट किपर रिचाकरवी झेलबाद केले. या दोन विकेट्स मॅचमध्ये एक नवे ट्विस्ट निर्माण करणाऱ्या अशाच होत्या. पण अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतल्यावरही दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा मात्र एका बाजूला तग धरून थांबली आहे. तिच टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.