इच्छुकांची गर्दी; तरी हरिभाऊ बागडे आघाडीवर
By Admin | Updated: August 28, 2014 00:23 IST2014-08-28T00:03:45+5:302014-08-28T00:23:37+5:30
औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्राचे निवडणुकांच्या तारखांकडे लक्ष लागलेले असताना औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये तिकिटासाठी इच्छुकांनी एकच भाऊगर्दी केली आहे.

इच्छुकांची गर्दी; तरी हरिभाऊ बागडे आघाडीवर
औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्राचे निवडणुकांच्या तारखांकडे लक्ष लागलेले असताना औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये तिकिटासाठी इच्छुकांनी एकच भाऊगर्दी केली आहे. पक्षातील एकूण १८ जण तिकिटासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाने मतदारसंघात सर्वेक्षण केले असता मतदारांनी हरिभाऊ बागडे (नाना) यांच्याच बाजूने कौल दिला.
जिल्ह्यात सिल्लोड, फुलंब्री आणि औरंगाबाद पूर्व हे तीनच मतदारसंघ भाजपाकडे आहेत. मतदारसंघात तब्बल १८ जण बाशिंग बांधून उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. यातील १४ जणांच्या एका गटाने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची अलीकडेच औरंगाबादेत भेट घेतली. या भेटीत सर्वांनी एकमुखी मागणी केली की, नवीन चेहऱ्याला संधी द्या. आमच्यापैकी कोणालाही तिकीट दिले तर आम्ही त्याचे मनापासून ‘काम’ करणार...! वरिष्ठ नेतेही अत्यंत चतुर निघाले. त्यांनी चेंडू परत इच्छुकांच्या कोर्टात टाकला. तुम्हीच ठरवा एकाचे नाव. या नावावर आजपर्यंत एकमत झालेले नाही.
फुलंब्री मतदारसंघात मागील दोन महिन्यांपासून उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. इच्छुकांची संख्या पाहून पक्षनेत्यांनाही धडकी भरली आहे. त्यांनी मुंबईच्या प्रबोधन या संस्थेला पाचारण करून मतदारसंघात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सर्वसामान्य नागरिकांनी पहिली पसंती नाना यांनाच दाखविली. हरिभाऊ बागडे सध्या मतदारसंघात प्रचाराच्या कामालाही जोरदारपणे लागले आहेत. त्यांच्यासोबत देवगिरी बँकेचे संचालक तथा इच्छुक उमेदवार प्रदीप पाटील नेहमी असतात. इतर सर्व उमेदवार आपापल्या पद्धतीने कामाला लागले आहेत.
हरिभाऊ बागडे यांच्यापाठोपाठ औरंगाबाद महापालिकेत दोनदा महापौर म्हणून काम पाहिलेले आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून डॉ. भागवत कराडही आघाडीवर आहेत. त्यांनीही मतदारसंघात गाठीभेटी आणि जनसंपर्क वाढविण्यावर अधिक भर दिला आहे.
काही उमेदवारांनी तर केंद्रीय आणि राज्याच्या नेत्यांना खाजगीत भेटणेही सुरू केले आहे. जिल्ह्यात भाजपाचा एकही आमदार नाही. यंदा खाते तरी उघडता यावे म्हणून सर्वांनी फुलंब्रीवर लक्ष केंद्रित केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३३ हजार ५०० मतांची लीड भाजपा उमेदवाराला मिळाली होती.
मतदारसंघातील प्रमुख इच्छुक
हरिभाऊ बागडे, डॉ. भागवत कराड, डॉ. नामदेवराव गाडेकर, सुरेंद्र साळुंके, सुहास शिरसाट, आसाराम तळेकर, एकनाथ जाधव, विकास दांडगे, भाऊसाहेब दहीहंडे, विकास चव्हाण, बापू घडामोडे, तारूअप्पा मेटे, शिवाजी पाथ्रीकर, सदनराव मते.