एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 07:15 IST2026-04-25T07:14:04+5:302026-04-25T07:15:12+5:30
Malaria: राज्यात गेल्या वर्षी मलेरियाच्या एकूण २३,२४७ रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
लोकमत न्यूजनेटवर्क
मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत मलेरियाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विशेषकरून पावसाळ्याच्या काळात या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून आली. गेल्या वर्षी राज्यात २३,२४७ रुग्णांची नोंद झाली असून, २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईत १०,१६२ रुग्ण सापडले असून, ७ रुग्ण मृत पावले आहेत.
मलेरिया हा आजार प्लाझमोडियम या परोपजीवी जंतूपासून होतो. राज्यात प्रामुख्याने प्लाझमोडिय व्हायवॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सिपेरम या दोन जाती प्रामुख्याने आढळून येतात. त्यापैकी प्लाझमोडिय फॅल्सिपेरम हा अत्यंत घातक असून, त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. मलेरियाविरोधात जनजागृती करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे हा या जागतिक मलेरिया दिनाचा उद्देश असला, तरी राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जागतिक मलेरिया दिनानिमित्त प्रशासनाने नागरिकांना स्वच्छता राखण्याचे, पाणी साचू न देण्याचे आणि डासांपासून संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. मलेरियाविरोधातील लढा यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
वर्षनिहाय आजाराची आकडेवारी
| वर्ष | रुग्ण संख्या | मृत्यू |
| २०२१ | १९,३०३ | १४ |
| २०२२ | १५,४५१ | २६ |
| २०२३ | १६,१५९ | १४ |
| २०२४ | २१,०७८ | २६ |
| २०२५ | २३,२४७ | २७ |
पूर्वी मलेरियाचे रुग्ण केवळ पावसाच्या काळात दिसत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत मलेरियाचा प्रादुर्भाव वर्षभर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणेज, मलेरियामध्ये ताप येतो आणि जातो, असे काही दिवस घडत असते. त्यामुळे रुग्ण काही वेळा औषधे घेत नाही. त्यामुळे आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. घरात पाणी कुठे साचणार नाही, याची काळजी घ्यावी. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो, मात्र काही वेळा उपचार घेण्यास वेळ घालविल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक सेंट जॉर्जेस रुग्णालय