रजिस्ट्री होत नसल्याने नागरिकांचा मुद्रांक कार्यालयात गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST2021-02-05T04:13:52+5:302021-02-05T04:13:52+5:30

औरंगाबाद : वडगाव कोल्हाटीसह सात ते आठ गाव परिसरातील रो-हाऊस व फ्लॅटच्या ‘रजिस्ट्री’ मुद्रांक नोंदणी कार्यालयाने ‘महारेरा’ तील तरतुदींचा ...

Citizens riot in stamp office due to non-registration | रजिस्ट्री होत नसल्याने नागरिकांचा मुद्रांक कार्यालयात गदारोळ

रजिस्ट्री होत नसल्याने नागरिकांचा मुद्रांक कार्यालयात गदारोळ

औरंगाबाद : वडगाव कोल्हाटीसह सात ते आठ गाव परिसरातील रो-हाऊस व फ्लॅटच्या ‘रजिस्ट्री’ मुद्रांक नोंदणी कार्यालयाने ‘महारेरा’ तील तरतुदींचा बडगा उगारून बंद केल्यामुळे सहकुटुंब सहपरिवार हेलपाटे मारून थकलेल्या नागरिकांचा संयम सोमवारी संपला. त्यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे यांना रजिस्ट्री का थांबविल्या आहेत, याचा जाब विचारला. कार्यालय आवारात तणावपूर्ण वातावरण झाल्यामुळे मुद्रांक अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. सकाळपासून आलेले नागरिक सायंकाळपर्यंत थांबून वैतागले, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी कार्यालय सोडले.

वडगाव कोल्हाटी, शेकापूरसह सात आठ गाव व परिसरातील दस्त नोंदणी करून देण्याबाबत नाव जरी कुणी काढले, तरी मुद्रांक अधिकारी घाबरत आहेत. त्या भागातील दस्त नोंदणी काही सरकारने बंद केलेली नाही. महारेराच्या नियमानुसार नवीन रो-हाऊस, फ्लॅट बांधलेले नाहीत, त्यांची दस्त नोंदणी होत नाही. परंतु जे पुनर्विक्रीचे व्यवहार आहेत, त्यांना काही अडचणी नसल्या, तरी त्यांचीही कागदपत्रे स्वीकारली जात नाहीत.

कामधंदा सोडून कार्यालयात सकाळपासून नागरिक येऊन बसतात. अधिकारी शुक्रवारी म्हणतात, सोमवारी या, सोमवारी गेले, तर म्हणतात, आमच्यावर दबाव येत असल्याचे सांगून अधिकारी नागरिकांना हाकलतात. असे असताना दलालांमार्फत रजिस्ट्री होत असून, सामान्य नागरिक मागील पंधरा दिवसांपासून मुला-बाळांसह कार्यालयाच्या आवारात येऊन बसत आहेत. जर रजिस्ट्री नोंदविणे बंद केले आहे, तर मग मागील आठवड्यात १७८ दस्त नोंदणी कुणी व कशासाठी केल्या, असा सवाल नोंदणीसाठी आलेले नागरिक अशोक गोमाटे यांनी केला.

दलालांच्या ताब्यात कार्यालय

नोंदणी अधिकाऱ्यांच्या चेंबरचा ताबा घेऊन दलाल बसतात. आतून चेंबर बंद करून नागरिकांना बाहेर हाकलण्याचे प्रकार तेथे घडत आहेत. दलाल उर्मटपणाची भाषा नागरिकांना वापरत आहेत. हे घडत असताना राजकारणी लोकांचे पंटर नोंदणी कार्यालयात आहेत. आम्ही निर्बंध केलेल्या भागात एकाची रजिस्ट्री केली, तर दुसरे आमच्यावर दबाब आणत आहेत. कुणी फोन करून धमक्या देत आहेत. अशी उत्तरे अधिकारी देत आहेत. परंतु मर्जीतील दलालांचे कागदपत्रे अधिकारी नोंदवून देत असल्याचे आरोप नागरिक करीत आहेत.

मुद्रांक अधिकाऱ्यांची माहिती अशी

वडगाव कोल्हाटी व इतर गांवातील दस्त नोंदणीबाबत नेमकी अडचण काय आहे, जे जाणून घेण्यासाठी जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे यांना विचारले असता, ते म्हणाले, वडगाव कोल्हाटी वगैरे असे काही नाही. जे अधिकृत असेल त्यांची दस्तनोंदणी होईल. रिसेलमध्ये काही अडचणी नाहीत. प्लॉट घेऊन रो-हाऊस बांधून विकत असेल, तर त्याच्या इतर काही परवानग्या लागतील. जे दस्त होत आहेत, ते अधिकृत आहेत. अनधिकृत दस्त नोंदणी होणार नाही.

Web Title: Citizens riot in stamp office due to non-registration