ग्रामीण भागातही बायोमेट्रिकने अनुदान

By Admin | Updated: August 13, 2014 01:42 IST2014-08-13T01:34:15+5:302014-08-13T01:42:26+5:30

औरंगाबाद : शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनाही आता बायोमेट्रिक पद्धतीने अनुदान वाटप होणार आहे.

Biometric grant in rural areas | ग्रामीण भागातही बायोमेट्रिकने अनुदान

ग्रामीण भागातही बायोमेट्रिकने अनुदान

औरंगाबाद : शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनाही आता बायोमेट्रिक पद्धतीने अनुदान वाटप होणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागातही आधार कार्डशी संलग्नित दिलासा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. फुलंब्री तालुक्यातून लवकरच त्याची सुरुवात होणार आहे.
शासनातर्फे अपंग, निराधार, विधवा, वयोवृद्ध यांना दरमहा विशिष्ट अनुदान वाटप केले जाते. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी योजनांच्या माध्यमातून बँकांमार्फत हे अनुदान दिले जाते; मात्र यामध्ये अनेक बोगस लाभार्थ्यांनी शिरकाव केला होता. त्याला अटकाव घालून खऱ्या लाभार्थ्यांनाच अनुदानाचा लाभ देता यावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी २०१२ साली शहरात दिलासा प्रकल्प कार्यान्वित केला. याअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यांना आधार कार्डशी संलग्नित करण्यात आले. त्यासाठी बायोमेट्रिक पद्धतही लागू केली. याअंतर्गत लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे घेऊनच अनुदान वाटप केले जाते. शहरातील प्रयोगानंतर आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी घेतला आहे. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेशी जिल्हा प्रशासनाने सामंजस्य करार केला आहे.
पहिल्या टप्प्यात फुलंब्री तालुक्यातून याची सुरुवात केली जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून लाभार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे, तसेच त्यांच्या बोटांचे ठसेही घेण्यात आले आहेत. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांच्यासह संजय गांधी योजनेच्या तहसीलदार आणि इतर अधिकारी त्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Biometric grant in rural areas