मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:22 IST2025-08-14T19:19:19+5:302025-08-14T19:22:25+5:30
याप्रकरणी सूर्यवंशी यांची बाजू मांडताना यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी विनंती केली होती.

मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
छत्रपती संभाजीनगर: परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यूप्रकरणी आता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी गुरुवारी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. याप्रकरणी सूर्यवंशी यांची बाजू मांडताना यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी विनंती केली होती.
परभणी येथील न्यायालयीन कोठडीत मरण पावलेले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले. या आदेशानुसार परभणी पोलिसांनी अज्ञांताविरोधात गुन्हा नोंदविला. या प्रकरणात सोमनाथची आई विजया सुर्यवंशी यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी झाली. ॲड. प्रकाश आंबेडकर हे या प्रकरणांत सुर्यवंशी यांची बाजू मांडत आहेत. खंडपीठात सरकारकडून सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषन विभागाच्या (सीआयडी)उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तपास सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदन करण्यात आले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाने विशेष तपास पथक नियुक्त करावे, अशी विनंती यापूर्वी केली होती. या विनंतीवरून सरकारतर्फे सांगण्यात आले की, बदलापूर प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश होते. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी पथक स्थापन केले होते. याप्रकरणातही खंडपीठाने पोलीस महासंचालकांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाकडून मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.