एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरुन हत्या करणारा आरोपी अटकेत, औरंगाबाद-नाशिक पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 19:32 IST2022-05-22T19:32:12+5:302022-05-22T19:32:32+5:30
औरंगाबाद शहरात एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय तरुणीवर चाकूचे 18 वार करुन हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील फरार आरोपीला नाशिकजवळील लासलगावमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरुन हत्या करणारा आरोपी अटकेत, औरंगाबाद-नाशिक पोलिसांची कारवाई
औरंगाबाद: काल म्हणजेच 21 मे रोजी शहरातील देवगिरी महाविद्यालय परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. एका 19 वर्षीय तरुणीला ओढत नेत चाकू भोसकून तिची हत्या करण्यात आली. शहराला हादरवणारी घटना काल दुपारी घडली. त्या घटनेतील फरार आरोपीच्या नाशिक ग्रामीण पोलीस आणि औरंगबाद पोलिसांनी लासलगावमधून मुसक्या आवळल्या आहेत.
सविस्तर माहिती अशी की, मृत सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश प्रीतपालसिंग ग्रंथी (18, रा. उस्मानुपरा) ही देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिकत होती. काल दुपारी ती महाविद्यालयाच्या मागच्या बाजूस असलेल्या कॅफेतून बाहेर अली असता, आरोपी शरणसिंग सेठी (20, रा. भीमपुरा, उस्मानपुरा) तिथे आला. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपीने तरुणीला कॉलेजपासून 200 फुट ओढत नेले आणि मानेवर, पोटावर धारदार हत्याराने 18 वार केले. त्यानंतर शरणसिंग तेथून दुचाकीवर पळून गेला.
सुखप्रीतच्या मैत्रिणीने या घटनेनंतर तिच्या भावाला फोन करून ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. दोन्ही भाऊ घटनास्थळी आले. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. शरणसिंगच्या विरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. भर दिवसा हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना झाली होती. आज आरोपी शरण सिंग याला लासलगावातून अटक करण्यात आले आहे.