अजब चोरट्याची गजब गोष्ट! पोलिसांना चकवा देऊन पळाला, घरी जाऊन जेवण करून झोपी गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:11 IST2026-04-28T16:11:13+5:302026-04-28T16:11:46+5:30

मुख्यमंत्र्यांचा बंदोबस्त अन् पोलिसांच्या डोळ्यांत धूळ! ठाण्यातून पळालेला चोरटा काही तासांत पुन्हा अटकेत

Amazing story of a strange thief in Chhatrapati Sambhajinagar! Accused Escapes from Pundlik Nagar Police Station, Found Sleeping at Home After Dinner | अजब चोरट्याची गजब गोष्ट! पोलिसांना चकवा देऊन पळाला, घरी जाऊन जेवण करून झोपी गेला

अजब चोरट्याची गजब गोष्ट! पोलिसांना चकवा देऊन पळाला, घरी जाऊन जेवण करून झोपी गेला

छत्रपती संभाजीनगर : गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपीने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातून रविवारी रात्री धूम ठोकली. पोलिसांनी झटपट शोध घेत काही तासांत त्याला पुन्हा अटक केली. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात प्रवाशाची बॅग व मोबाईल हिसकवल्याच्या गुन्ह्यात या आरोपीला अटक केली होती.

मुख्यंमत्र्यांच्या दौऱ्यामुळे रविवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्तात व्यस्त असल्याची संधी चोरट्याने साधली. घरी जाऊन त्याने पोटभर जेवण केले व चक्क झोपी गेला. अभिषेक उर्फ भैय्या गोरखनाथ भुमकर (२१, रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या प्रतिबंधक पथकाने प्रवाशाची बॅग आणि मोबाईल हिसकावणाऱ्या अभिषेक उर्फ भैय्या गोरखनाथ भुमकर ( २१, रा. मुकुंदवाडी) याला पाठलाग करून ताब्यात घेतले. नंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याचा साथीदार सोमीनाथ उर्फ सोनु रवी नरोडे (२३, रा. चिकलठाणा) यालाही अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ९ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हस्तगत केले आहेत. 

आरोपींना पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात ठेवले होते. ठाण्यात अर्ध्या तासाहून अधिक वेळ बसल्यानंतर एक आरोपी पसार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तेव्हा पोलिसात खळबळ उडाली. आरोपीचा तात्काळ शोध सुरू करत थेट घर गाठले. तेव्हा हा आरोपी घरी पोटभर जेवण करून शांत झोपलेला पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेत ठाण्यात आणले.

Web Title: Amazing story of a strange thief in Chhatrapati Sambhajinagar! Accused Escapes from Pundlik Nagar Police Station, Found Sleeping at Home After Dinner