दुसऱ्या दिवशीही विमान रद्द

By Admin | Updated: December 18, 2014 00:42 IST2014-12-18T00:13:28+5:302014-12-18T00:42:46+5:30

औरंगाबाद : स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान बुधवारीही रद्द झाल्याने ११० प्रवाशांना प्रवासासाठी धावाधाव करण्याची वेळ आली.

The aircraft canceled the next day | दुसऱ्या दिवशीही विमान रद्द

दुसऱ्या दिवशीही विमान रद्द

औरंगाबाद : स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान बुधवारीही रद्द झाल्याने ११० प्रवाशांना प्रवासासाठी धावाधाव करण्याची वेळ आली. यावेळी विमान रद्द झाल्याबाबत मेसेज न मिळाल्याने अनेक प्रवासी विमानतळावर आले होते; परंतु ऐनवेळी विमान रद्द झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे कंपनीच्या अधिकाऱ्यांना विमान रद्द होणार होते हे माहीत असूनही विमानाचे बुकिंग करून छळ करण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला.
स्पाईस जेटच्या बेपर्वाईचा प्रत्यय सलग दुसऱ्या दिवशी विमानतळावर आला. मंगळवारी दिल्लीला जाणारे विमान (क्रमांक : सीजी १७३) अचानक रद्द झाल्याने १२२ प्रवाशांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला होता. आज बुधवारीही विमान रद्द झाल्याने हीच परिस्थिती दिसून आली. विमान रद्द झाल्याबाबत प्रवाशांना ‘मेसेज’ तसेच ‘कॉल’ करून माहिती देण्यात आल्याचे विमानतळावरील स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु प्रत्यक्षात अनेकांना हा मेसेज मिळाला नसल्याचे दिसून आले. ‘मेसेज’ आणि ‘कॉल’ न आल्यामुळे अनेक प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांकडून विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. ऐनवेळी विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. विमान रद्द झाल्याने पुण्याहून दिल्ली जाण्याची वेळ काही जणांवर आली; परंतु सकाळीच कळाले असते, तर लवकर निघता आले असते, असे प्रवाशांनी सांगितले.
गुरुवारचे उड्डाणही अनिश्चित
मंगळवारचे विमान रद्द झाल्यानंतर बुधवारचे विमान जाणार की नाही, याची अनिश्चितता निर्माण झाली होती. अशा स्थितीतही तिकिटाची बुकिंग झाल्याचे दिसून आले. बुधवारीही विमान रद्द झाल्यानंतर किमान गुरुवारी जाणार का, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला. त्याबाबत काहीही सांगता येणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. यामुळे स्पाईस जेटची औरंगाबादहून पुढील उड्डाणे होणार किंवा नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण निर्माण झाली आहे.
मोठ्या विमानाची उपलब्धता
एअर इंडियाची सध्या १३० आसनी विमानसेवा आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आगामी काळात १७२ आसनी विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एअर इंडियाचे स्टेशन मॅनेजर वसंत बरडे यांनी सांगितले.

Web Title: The aircraft canceled the next day