निम्या पावसाळ्यानंतरही तलाव कोरडेठाक

By Admin | Updated: July 31, 2014 00:44 IST2014-07-31T00:19:02+5:302014-07-31T00:44:21+5:30

तामलवाडी : पावसाळ्यातील दोन महिन्याचा कालावधी संपला तरी तामलवाडी परिसरात अद्याप मोठा पाऊस झाला नाही

After the Nimya rains, the lake is dry | निम्या पावसाळ्यानंतरही तलाव कोरडेठाक

निम्या पावसाळ्यानंतरही तलाव कोरडेठाक

तामलवाडी : पावसाळ्यातील दोन महिन्याचा कालावधी संपला तरी तामलवाडी परिसरात अद्याप मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागातील साठवण पाझर तलाव, नाले अद्याप कोरडेठाक असून, सद्यस्थितीत तलावांत केवळ जनावरांना पिण्यापुरता पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या केवळ रिमझिम पाऊस पडत असल्याने या पाण्याने तलाव कधी भरणार, याची चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
मृगाच्य नक्षत्रात हलकासा पाऊस झाल्यानंतर दीड महिन्यानी पेरणीलायक पाऊस पडला आणि शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. त्याच ओलीवर पेरलेले बी उगवले पण सध्या पावसाअभावी उगवलेले पीक वाळून जात आहे. दमदार पाऊस न झाल्याने या भागातील धोत्री, देवकुरुळी, तामलवाडी, सांगवी, माळुंबा, पांगरधरवाडी हे साठवण तलाव पाण्याअभावी कोरडे ठाक पडले आहेत. मृत पाणी साठ्यावर सध्या जनावरांची तहान भागत आहे. विहिरीचा पाणीसाठा अद्याप वाढला नाही. नाले, ओढे कोरडे आहेत. शेतकरी उसाची मशागत करुन खताची माता देवून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तलावात पाणीसाठा नाही झाल्यास भागातील शेकडो हेक्टर ऊस पाण्याअभावी वाळून जाण्याची भिती आहे. तामलवाडी परिसरात मोठ्या पावसाची गरज असून, चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)
ना गेट आणले, ना दुरूस्ती केली
कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ पाऊस संपताच ओढ्यातून वाहणारे पाणी अडविण्यासाठी अद्याप बंधाऱ्याजवळ गेट आणले नाहीत की नादुरुस्ती केली नाही. त्यामुळे यंदाही पाणी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चाऱ्याची परजिल्ह्यात विक्री
या भागात चारा प्रश्न गंभीर बनलेला असताना दररोज हजारो पेंड्या कडबा सोलापूर, बार्शीकडे विक्रीसाठी जात असल्याचे दिसत आहे. यावर प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. अशीच विक्री चालू राहिल्यास चारा टंचाई भासण्याची शक्य शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Web Title: After the Nimya rains, the lake is dry