ॲड. मिथुन भास्कर हत्या प्रकरणाचा उलगडा; लूटमारीसाठी तृतीयपंथीयाने टोळीसह केला खून, मुख्य मारेकऱ्यासह तिघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:49 IST2026-04-17T17:47:57+5:302026-04-17T17:49:08+5:30

"१० मिनिटांत येतो" असे पत्नीला सांगितले अन् घात झाला; वकील भास्कर यांच्या हत्येचा थरारक घटनाक्रम उघड.

Advocate Mithun Bhaskar Murder Case Solved: Transgender Accused Arrested for Killing Lawyer Over Robbery | ॲड. मिथुन भास्कर हत्या प्रकरणाचा उलगडा; लूटमारीसाठी तृतीयपंथीयाने टोळीसह केला खून, मुख्य मारेकऱ्यासह तिघे अटकेत

ॲड. मिथुन भास्कर हत्या प्रकरणाचा उलगडा; लूटमारीसाठी तृतीयपंथीयाने टोळीसह केला खून, मुख्य मारेकऱ्यासह तिघे अटकेत

छत्रपती संभाजीनगर : लुटमारीच्या प्रयत्नातूनच ॲड. मिथुन पुंडलिक भास्कर (४९, रा. आनंदनगर) यांची तृतीयपंथी व त्याच्या टोळीने हत्या केल्याचे निष्पन्न झाले. बीडबायपासवरील गांधेली शिवारात गुरुवारी रात्री ११ वाजता हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी मुख्य मारेकरी व स्वत:ला तृतीयपंथी सांगणाऱ्या सादिक बशीर अन्सारी (४०, रा. शहानुरमिया दर्गा, उस्मानपुरा) याच्या पहाटे ४ वाजता मुसक्या आवळल्या, तर त्याला लुटमार व हत्येत मदत करणाऱ्या नानासिंग हिरासिंग जुनी (२०, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) याला अटक केली, तर त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकील म्हणून कार्यरत भास्कर बीडबायपासवरील आनंदनगरामध्ये कुटुंबासह वास्तव्यास होते. १५ एप्रिलला न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर घरी पोहोचलेच नाही. त्यांचा सर्वत्र शोध घेत असलेली बहीण मधुरा भास्कर यांना रात्री १०.४७ वाजता मिथुन यांच्या एका मित्राने संपर्क केला. मधुरा यांनी धाव घेतली असता गांधेली शिवारात मिथुन गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते. शर्टचे बटन उघडलेले, बनियनला रक्ताचे डाग, बूट पायातून निघालेला व मांडीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यांना घाटीत रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री १२.१० वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे, भागिरथी पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक भारत पाचोळे, उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुदळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

७ वाजता पत्नीसोबत शेवटचे बोलणे
- रोज साधारण ६ वाजेपर्यंत घरी पोहोचणारे मिथुन बुधवारी ७ वाजेनंतनही पोहाचले नव्हते. ७ वाजता त्यांच्या पत्नीने त्यांना काॅल केला. तेव्हा मिथुन यांनी १० मिनिटांत पोहोचतो, असे कळवले. ८.३० वाजूनही मिथुन परतेच नाही. चिंताग्रस्त पत्नीने सासू तसेच गुन्हे अन्वेषण विभागात अधिकारी असलेल्या मिथुन यांची बहीण मधुरा यांना संपर्क केला.
- कामानिमित्त बीडला गेलेल्या मधुरा यांनी शहरात परतताच भावाचा शोध सुरू केला. १०.३० वाजता गांधेली शिवारात त्यांना गर्दीदेखील दिसली. मात्र, तेथे पडलेला जखमी व्यक्ती आपला भाऊ असेल, असे त्यांच्या मनातही आले नाही. त्यामुळे त्या तसेच मिथुन यांचा शोध घेत पुढे गेल्या.

रोख रक्कम मागितल्यानंतर वाद अन् हत्या
मिथुन बुधवारी सायंकाळी गांधेली शिवारात कामानिमित्त गेले होते. स्वत:ला तृतीयपंथी सांगणाऱ्या सादिकने त्यांना रस्त्यात गाठून साधारण ५० मीटर आत नेत पैशांची मागणी केली. मिथुन यांनी ३०० रुपयांची तयारी दाखविली. मात्र, त्याने आणखी रोख मागत लुटण्याचा प्रयत्न केला. टाळ्यांचा ईशारा देत सादिकने अन्य टोळीला बोलावून घेतले. सर्वांनी मिळून मिथुन यांना मारहाण करत त्यांचे पाकीट, मोबाइल हिसकावून खिसे चाचपण्यास सुरुवात केली. मिथुन यांनी तीव्र विरोध केला. तेवढ्यात सादिकने त्यांच्या मांडित चाकू खुपसला. चाकूच्या पहिलाच वार खोलवर जात त्यांच्या पायाची मुख्य धमनी कापली गेली. घटनास्थळी सर्वत्र रक्त सांडले होते. त्यावरून मिथुन रक्तबंबाळ अवस्थेत पळण्याच्या प्रयत्न करताना त्यांना खाली पाडून पकडण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले. हा अपघात दाखविण्यासाठी त्यांना रस्त्यावर फेकून मारेकरी पसार झाले. यातच मिथुन यांचा मृत्यू झाला. मिथुन यांना मुलगा, मुलगी पत्नी आहे. त्यांचे वडील सेवानिवृत्त प्राचार्य असून, आई सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहे.

१३ पेक्षा अधिक तृतीयपंथी ताब्यात, हत्येनंतर गुरूच्या घरात लपला
- हत्या करून टाेळी पसार झाली. स्वत:ला तृतीयपंथी सांगणाऱ्या सादिकने थेट शिवाजीनगरमधील त्याच्या गुरूचे घर गाठले. तिला हत्येची माहिती दिली. रक्ताने माखलेे कपडे बदलून तो तेथेच लपून बसला होता.
- पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सोमनाथ जाधव, भारत पाचोळे, उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुदळे यांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. बीडबायपासवर रोज उभ्या राहणाऱ्या तृतीयपंथीयांची माहिती मिळवली. जवळपास १३ तृतीयपंथीयांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, रोज बीडबायपासवर उभा राहणारा सादिक मात्र मिळून येत नव्हता.
- खबऱ्यामार्फत सादिक शिवाजीनगरमधील गुरूच्या घरी लपल्याची माहिती प्राप्त होताच पथकाने जात त्याच्या मुसक्या आवळल्या.

वेगवेगळ्या कथा रचल्या, दिवसभर फिरवले
सादिकने गुरुवारी दिवसभर वेगवेगळ्या कथा रचल्या. विविध तृतीयपंथीयांचे नाव सांगत त्याने दहापेक्षा अधिक घरी पोलिसांना फिरविले. त्याच्या उत्तरांत तफावत येत गेल्याने त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याचा साथीदार नानासिंगला पकडले. स्वतंत्र चौकशीत त्याने सांगितलेल्या घटनाक्रमानंतर हत्येचा नेमका उलगडा झाला. अखेर, पोलिसांचा पाहुणचार मिळाल्यानंतर सादिकने दुपारी ४ वाजता हत्येची कबुली दिली.

Web Title : एडवोकेट मिथुन भास्कर हत्याकांड का खुलासा: लूट के लिए ट्रांसजेंडर और गिरोह गिरफ्तार।

Web Summary : एडवोकेट मिथुन भास्कर की हत्या का खुलासा हुआ; लूट के इरादे से हत्या करने के आरोप में एक ट्रांसजेंडर व्यक्ति और उसके साथियों को गिरफ्तार किया गया। मुख्य आरोपी और दो अन्य हिरासत में हैं। लूट का विरोध करने पर उसकी हत्या कर दी गई।

Web Title : Advocate Mithun Bhaskar Murder Solved: Transgender and Gang Arrested for Robbery.

Web Summary : Advocate Mithun Bhaskar's murder was solved; a transgender person and accomplices were arrested for robbery-motivated killing. The main accused and two others are in custody. He was murdered for resisting the robbery attempt.