Lasur Accident: भरधाव ट्रॅक्टरची २ दुचाकींना धडक, दिवाळी खरेदी करून परतताना पती ठार, पत्नीसह दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:38 IST2025-10-17T12:38:46+5:302025-10-17T12:38:58+5:30
Lasur Accident: शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चारही जखमींना लासूर स्टेशन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Lasur Accident: भरधाव ट्रॅक्टरची २ दुचाकींना धडक, दिवाळी खरेदी करून परतताना पती ठार, पत्नीसह दोघे जखमी
लासूर स्टेशन : येथून दिवाळीची खरेदी करून परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकी धामोरी फाट्याजवळ भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात पतीचा मृत्यू झाला; तर पत्नी गंभीर जखमी झाली. याच ट्रॅक्टरने समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळही एका दुचाकीला उडवले असून, त्यावरील दोघेही जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. १६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलसिंह नरसिंह जारवाल (वय ४२, रा. वसझडी, ता. गंगापूर) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे; तर, पत्नी रंजना या जखमी आहेत. दुसऱ्या दुचाकीवरील टापरगाव येथील एकजण व महिला होती. तेही गंभीर जखमी झाले; परंतु त्यांची नावे कळू शकली नाहीत. जारवाल दाम्पत्य लासूर स्टेशन येथे दिवाळीची खरेदी करून परतत असताना लासूर गाव ते डोणगाव रस्त्यावर धामोरी फाटा येथे त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिली.
यापूर्वी समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळही याच ट्रॅक्टरने टापरगाव येथील रहिवाशांच्या दुचाकीला उडवले. माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चारही जखमींना लासूर स्टेशन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असताना विठ्ठलसिंग जारवाल यांचे निधन झाले; तर, त्यांच्या पत्नी रंजना यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील घाटीत उपचार सुरू आहेत. पुढील तपास शिल्लेगाव पोलिस करत आहेत.